मुलायम सिंहांची मर्सिडिज खराब झाली; सरकार देणार 'स्वस्त' कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:47 PM2019-09-22T16:47:46+5:302019-09-22T16:48:40+5:30
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने नुकताच आमदार, मंत्र्यांचा आयकर सरकारी तिजोरीतून देण्याचा निर्णय मागे घेतला होता.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची मर्सिडिज कार दुरुस्त करण्याच्या विचारात राज्य सरकार नाही. याचबरोबर माजी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या कारच्या बजेटलाही कात्री लावण्याची तयारी योगी सरकारने केली आहे. यामुळे मुलायम यांच्याकडील मर्सिडिज कार माघारी घेतली जाणार असून त्यांना त्यापेक्षा स्वस्तातील पण 1 कोटींची टोयोटा प्रॅडो कार देण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने नुकताच आमदार, मंत्र्यांचा आयकर सरकारी तिजोरीतून देण्याचा निर्णय मागे घेतला होता. आता माजी मुख्यमंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या कारचे बजेट 1.5 कोटींवरून 1 कोटींवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुलायम सिंह 1.5 कोटींची मर्सिडिज एसयुव्ही कार वापरतात.
राज्य सरकारने बजेट कमी केल्याने मुलायम सिंहांना आता कमी किंमतीची कार स्वीकारावी लागणार आहे. महसूल विभागाने सांगितले की, त्यांच्या कारमध्ये बिघाड झाला आहे. तो दुरुस्त करण्यासाठी 26 लाखांचा खर्च येईल. यामुळे सरकार एवढी मोठी रक्कम खर्च करण्याच्या तयारीत नाही.
राज्य सरकारकडे सध्या दोन मर्सिडिजच्या एसयुव्ही आहेत. या कारचा वापर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करतात. यामुळे महसूल विभाग मुलायम सिंहांसाठी टोयोटा प्रॅडो कार आणण्याचा विचार करत आहे. सध्या मुलायम सिंह बीएमडब्ल्यूची कार वापरत आहेत.