मुलायमसिंह यांनी दिली जीवे मारण्याची धमकी
By admin | Published: July 12, 2015 04:22 AM2015-07-12T04:22:28+5:302015-07-12T04:22:28+5:30
समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने
लखनौ : समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने केल्याने खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याने शनिवारी यादव यांच्याविरुद्ध लखनौच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली.
तक्रारकर्ते अमिताभ ठाकूर हे पोलीस महानिरीक्षक (नागरी सुरक्षा) आहेत. याप्रकरणी ठोस भूमिका घेणे आवश्यक वाटल्याने मुलायमसिंह यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे मुलायमसिंह यांच्याशी तातडीने संपर्क होऊ शकला नसला तरी एका सपा नेत्याने हे आरोप फेटाळले आहेत. ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री माध्यमांसाठी एक दृकफीत जारी केली होती. त्यात मुलायमसिंह हे ठाकूर यांना सुधरा अथवा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असे धमकावीत असल्याचे ऐकण्यात आले.
शंका टेपच्या खरेपणावर
ठाकूर यांनी जारी केलेल्या टेपच्या खरेपणाबद्दल शंका घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश पांडेय यांनी अमिताभ व सपाप्रमुखांदरम्यान कथित संभाषणाची सत्यता पडताळून बघितल्यावरच पुढील कारवाई केली करू, असे स्पष्ट केले.