Mulayam Singh Yadav Death: देवेगौडा नाही, मुलायम सिंहच पंतप्रधान होणार होते, तयारीही झालेली, पण... दोनदा संधी हुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:03 IST2022-10-10T13:02:30+5:302022-10-10T13:03:12+5:30
सरकार स्थापन करण्यासाठी तेव्हाचे मोठे नेते किशन सिंह सुरजित यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी मुलायम सिंहांच्या नावाचा आग्रह धरला.

Mulayam Singh Yadav Death: देवेगौडा नाही, मुलायम सिंहच पंतप्रधान होणार होते, तयारीही झालेली, पण... दोनदा संधी हुकली
मुलायम सिंह यादव यांना राजकारणाच्या आखाड्यातील पैलवान म्हटले जायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज आपल्या भाषणाची सात मिनिटे मुलायम सिहांची स्तुती केली. युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री ते केंद्रात संरक्षण मंत्री झालेल्या या मुलायम सिंहांची पंतप्रधान न होण्याची गोष्ट देखील खूप महत्वाची आहे.
मुलायम सिंह यादव एकदा नाही दोनदा पंतप्रधान होता होता राहिले होते. मुलायम सिंहांनी भर सभेत त्यांच्या पंतप्रधान न होण्यामागच्या ' चार शुक्राचार्यांची' नावे घेतली होती. देवेगौडा पंतप्रधान झाले, परंतू त्यांच्या जागी मुलायम सिंहांचे नाव चर्चेत होते. १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. काँग्रेसच्या १४१ जागा आणि भाजपाच्या १६१ जागा आल्या होता. तेव्हा अटल बिहारी वायपेयी यांना सरकार बनविण्याचे निमंत्रण मिळाले. वाजपेयींचे सरकार १३ दिवसांतच पडले.
आता काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी होती. मात्र, त्यांना सर्व पक्षांना एकत्र घेऊन खिचडी सरकार बनवायचे नव्हते. व्ही पी सिंह यांनी देखील पंतप्रधान बनण्यास नकार दिला. मात्र, याचवेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पीएम बनविण्यासाठी नाव पुढे केले. या नावावर पोलिट ब्युरोने फुली मारली. आता उरले लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव. त्यात लालू यांचे नाव चारा घोटाळ्यात बदनाम होऊ लागले होते. यामुळे लालू रेसमधून बाहेर पडले.
सरकार स्थापन करण्यासाठी तेव्हाचे मोठे नेते किशन सिंह सुरजित यांना जबाबदारी देण्यात आली. त्यांनी मुलायम सिंहांच्या नावाचा आग्रह धरला. मुलायम सिंह पीएम होणार हे पक्के झाले, शपथ समारंभाची तशी तयारीही करण्यात आली. पण लालू यादव आणि शरद यादव यांनी त्यास विरोध दर्शविला. यामुळे नंतर एचडी देवेगौडांचा नंबर लागला.
देवेगौडांचे सरकारही काही महिन्यांनी पडले. १९९९ मध्ये पुन्हा निवडणुका लागल्या. मुलायम सिंह संभल आणि कन्नौजच्या जागांवर जिंकले होते. पंतप्रधान पदासाठी पुन्हा त्यांचे नाव आले. तेव्हाही यादव नेत्यांनी यास विरोध केला. तेव्हाही लालू प्रसाद पुढे होते. ही दुसरी संधी निघून गेली. मुलायम यांनी एका सभेत लालू प्रसाद यादव, शरद यादव, चंद्रा बाबू नायडू आणि व्ही पी सिंहांचे नाव घेत यांच्यामुळेच मी पंतप्रधान बनलो नाही, असे सांगितले होते.
मुलायमसिंग यादव 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 असे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. मुलायम सिंहांना गृह मंत्री पद हवे होते. परंतू, त्यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आले. त्याचेही त्यांनी सोने केले.