जेव्हा मुलायमसिंह भर लोकसभेत म्हणतात, मोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावं...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 04:34 PM2019-02-13T16:34:38+5:302019-02-13T18:56:17+5:30
समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि आझमगडचे खासदार मुलायम सिंह यादव यांनी मोठं विधान केलं आहे.
नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आणि आझमगडचे खासदार मुलायम सिंह यादव यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. विशेष म्हणजे भाजपा विरोधात महागठबंधन तयार होत असताना मुलायम सिंह यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुढे मुलायम सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी त्यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देतो. लोकसभेतील सर्व सदस्य पुन्हा निवडून येऊ देत आणि तुम्ही परत पंतप्रधान व्हा, असंही मुलायम सिंह यादव लोकसभेत मोदींना उद्देशून सांगितलं आहे. मुलायम सिंह यांच्या या विधानानंतर लोकसभेच्या पुढच्या बाकावर बसलेल्या सोनिया गांधींनाही हसू आलं.
समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी नेहमीच चांगलं काम करत आले आहेत. त्यांनी नेहमीच माझी मदत केली आहे. मोदींचं कौतुक केल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांनी मोदींना हात झोडून अभिवादनही केलं. तत्पूर्वी समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी लखनऊमध्ये कार्यकर्त्यांवर केलेल्या बळाच्या प्रयोगावर टीका केली होती. त्यावेळी केंद्र सरकारनं सांगितलं होतं की, भाजपा आणि केंद्राचा याच्याशी काही देणंघेणं नाही.
Samajwadi Party's Mulayam Singh Yadav in Lok Sabha: PM ko badhaai dena chahta hun ki PM ne sabko saath lekar chalne ki koshish ki hai. Main kehna chahta hun ki saare sadaysa phir se jeet kar aayen, aur aap (PM) dobara pradhan mantri banein (File pic) pic.twitter.com/reeyh5H9bB
— ANI (@ANI) February 13, 2019
लोकसभेत समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे प्रयागराजमध्ये करण्यात आलेल्या लाठीचार्जसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात विशेषाधिकारात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला असून, तो स्वीकार करण्याची मागणी सुमित्रा महाजनांकडे केली आहे.