Mulayam Singh Yadav: सपाची सत्ता गेल्यानंतर मुलायम सिंह मोदींच्या कानात काय म्हणाले होते? वाचा तो किस्सा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 02:33 PM2022-10-10T14:33:08+5:302022-10-10T14:33:56+5:30
Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर नेताजींच्या खासगी-सार्वजनिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत आहेत.
Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे (SP) नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे आज निधन झाले आहे. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर, त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक-राजकीय आयुष्यातील अनेक किस्से समोर येत आहेत. यातील एक किस्सा उत्तर प्रदेशातील सत्ता गमावल्यानंतरचा आहे. सत्ता गमावल्यानंतर मुलायमसिंह यादवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कानात काहीतरी म्हटले होते.
कधीची घटना आहे?
2012 मध्ये यूपीमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार आले होते. मुलायम सिंह यादव यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्याकडे सोपवली. 2017 मध्ये, सपाला भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भाजप सरकारचा शपथविधी कार्यक्रम झाला, त्यात मुलायमसिंह यादवही पोहोचले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. मुलायमसिंह यादव त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत मंचावर पोहोचले. मुलायम यांनी पीएम मोदींच्या कानात काहीतरी सांगितले, जे ऐकून पीएम मोदींनी हसून अखिलेश यादव यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावेळी बरीच चर्चा झाली होती की, नेताजी पंतप्रधानांच्या कानात काय म्हणाले?
काय म्हणाले होते नेताजी?
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात म्हटले होते की, "माझ्या मुलाची काळजी घ्या.'' त्यानंतर पीएम मोदींनी अखिलेश यादव यांच्या खांद्यावर हात ठेवला. मात्र, अखिलेश यादव यांनी टेलिग्राफचा अहवाल साफ फेटाळून लावला आणि एका कार्यक्रमादरम्यान त्या दिवशी झालेल्या संभाषणाचे रहस्य उघड केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अखिलेश यादव म्हणाले होते की, ''माझ्या वडिलांनी नरेंद्र मोदींना, माझ्या मुलापासून दूर राहा, असे सांगितले होते.'' असा खुलासा अखिलेश यांनी केला.