Mulayam Singh Yadav: मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावली; ICUमध्ये दाखल, अखिलेश यादव दिल्लीला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 05:18 PM2022-10-02T17:18:09+5:302022-10-02T17:20:50+5:30
मुलायम सिंह यादव यांच्यावर अनेक दिवसांपासून मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत, आज त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या ते आयसीयूत आहेत. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत.
अखिलेश दिल्लीला रवाना
वडील मुलायम सिंह यादव यांच्या तब्येतीची माहिती मिळताच सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लखनौहून दिल्लीला रवाना झाले आहेत. शिवपाल सिंह यादव हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. मुलायम सिंह यादव अनेक दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.
Haryana | Former UP CM & Samajwadi Party leader Mulayam Singh Yadav admitted to Medanta hospital in Gurugram
— ANI (@ANI) October 2, 2022
(File Pic) pic.twitter.com/fjTHGLzMpX
श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास
डॉ. नरेश त्रेहान आणि डॉ. सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. 82 वर्षीय मुलायम सिंह यादव यांची प्रकृती गेल्या अनेक वर्षांपासून ठीक नाहीय. त्यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे. रविवारी दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला आहे.
अनेक दिवसांपासून उपचार सुरू
मुलायम सिंह यादव यांना जूनमध्ये मेदांतामध्ये दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नीचे जुलैमध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. गेल्या अनेक दिवसांपासून मुलायमसिंह यादव मेदांता हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल होते.