यंदा बहुरंगी लढत : पंजाबमध्ये सरकार कोणाचे येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:03 AM2022-03-07T06:03:40+5:302022-03-07T06:03:52+5:30
बहुमतासाठी ५९ जागा आवश्यक; मागील पाच निवडणुकांत मतदारांचा स्पष्ट कौल
- बलवंत तक्षक
लाेकमत न्यूज नेटवर्क
चंडीगढ : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान पार पडल्या पासूनच यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज लावला जात अहे. राज्यात संमिश्र सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी १० मार्च रोजी निकाल जाहीर झाल्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला ५९ जागा मिळणे आवश्यक आहेत.
काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल का?, आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल का?, किंवा अकाली दल- बसपा आघाडी काही चमत्कार करील का?, अशीही चर्चा आहे. भाजपसाठी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव ढिंढसा यांच्यासोबतची युती किती फायदेशीर ठरते? या सर्व प्रश्नांची उत्तरे १० मार्च रोजीच मिळतील. चर्चा काहीही होत असली तरी पंजाबच्या मतदारांनी गेल्या पाच निवडणुकीत स्पष्ट कौल दिला आहे. त्रिशंकू विधानसभा दिली नाही. तथापि, मतदानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते की, सरकार कोणाचे येईल, हे ज्योतिषीच सांगू शकतील. अकाली दलाचे वरिष्ठ नेते बिक्रम सिंग माजीठिया यांनीही असे संकेत दिले होते की, सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाची मदत घेतली जाऊ शकते.
काँग्रेसच विजयी होईल, असा विश्वास काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व्यक्त करीत आहे; परंतु, माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल यांचे म्हणणे आहे की, आघाडी सरकारसाठी काँग्रेस आणि आपचा समझोता होऊ शकतो.
ज्या पक्षाचे जास्त आमदार, त्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते.
वास्तविक पाहता पंजाबमध्ये यावेळी एक विशिष्ट लाट नव्हती. मालवामध्ये सत्ता परिवर्तनासाठी मतदानाचा जोर दिसला आणि दोआबामध्ये मतदान साधारण झाले. मतदानाच्या टक्केवारीत जेव्हाही बदल झाला, तेव्हा पंजाबमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे, हे विशेष. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास नाईलाजाने आघाडी स्थापन करावी लागेल, एवढे मात्र खरे आहे
कोण आहेत मैदानात?
पंजाबमध्ये अगोदर काँग्रेस आणि अकाली-भाजप आघाडीत थेट लढत होत असे; यावेळी बहुरंगी लढत होती. यावेळी अकाली दल आणि भाजपने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. अकाली दलाने बसपासोबत, तर भाजपाचे अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस आणि ढिंढसा यांच्या संयुक्त अकाली दलासोबत आघाडी केली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या २२ संघटनांचा संयुक्त समाज मोर्चाही यावेळी निवडणुकीत मैदानात उतरला आहे.