मुंबई, चंद्रपूर, कानपूर...! सोशल लाईक्स ठरतोय जीवघेणा: ७२ तासांत ८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:49 PM2023-07-17T13:49:50+5:302023-07-17T13:50:54+5:30
सोशल मीडियाची क्रेझ तरुणांमध्ये इतकी झालीय त्यात निष्काळजीपणामुळे अनेकांनी स्वत:चा जीव गमावला.
मुंबई – सोशल मीडियावरील लाईक्सची भूक आता जीवघेणी ठरत आहे. फॉलोअर्स वाढवण्यासाठी निरनिराळे शक्कल क्रिएटर लढवतात. त्यात स्वत:चा जीव जाण्याचीही चिंता त्यांच्या मनात येत नाही. मागील ७२ तासांत निष्काळाजीपणामुळे ४ अशा घटना समोर आल्या आहेत ज्यात ८ जणांचा जीव गमवावा लागला आहे. त्यात केवळ युवावर्गच नाही तर ज्येष्ठांचाही समावेश आहे.
मुंबईत २ मुलांचे आई वडील समुद्रात फोटो काढण्याच्या नादात डेंजर झोनपर्यंत गेले. त्यावेळी आलेल्या मोठ्या लाटेने दोघांनाही समुद्रात नेले. या घटनेत महिलेच्या पतीचा जीव थोडक्यात वाचला पण दुर्दैवाने महिलेचा जीव गेला. दुसरीकडे इन्स्टाग्राम रिल्स बनवण्याचे वेड लागलेले २ युवक पाण्यात बुडाले. यूपीच्या इटावा येथील नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह अद्याप शोधला जात आहे. हे दोघे नदीत उतरून इन्स्टा रिल बनवत होते. मृतांमध्ये १७ वर्षीय रेहान आणि १३ वर्षीय चांद यांचा समावेश आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असताना इन्स्टा रिल्स बनवणे दोघांच्या जीवावर बेतले आहे.
कानपूरमध्येही असाच प्रकार घडला. त्याठिकाणी इन्स्टा रिल बनवण्यासाठी नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. ५ मित्र धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यातील एकाचा नदीत उतरल्याने मृत्यू झाला. यावेळी इतर चौघे आरडाओरड करू लागले पण अंश या मुलाचा मृत्यू झाला. मुंबईच्या वांद्रे इथं पत्नी ज्योती सोनार, २ मुले यांच्यासह पिकनिकसाठी आलेला मुकेश सोनार हे सर्व समुद्राच्या लाटेत फसले. मुकेश सोनार कसाबसा पाण्यातून बाहेर आला परंतु ज्योती सोनारचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आई वडिलांचा फोटो काढणारी दोन्ही मुले एका दगडावर जाऊन बसली. परंतु एक मोठी लाट आल्यानंतर दोघेही पाण्यात खेचले गेले.
चंद्रपूर येथेही सेल्फी घेण्याच्या नादात ४ युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. चंद्रपूरच्या नागभीड तहसील जवळील ही घटना आहे. वरोरा तहसीलच्या शेगाव इथं ८ युवक पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. एक युवक तलावाकिनारी सेल्फी घेत होता त्यावेळी त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी ३ मित्र एकापाठोपाठ १ तलावात उतरले. परंतु हे तिघेही तलावात बुडू लागले. या दुर्देवी घटनेत चौघा मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला.