एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांचा; ३२ कोटी लिटर इंधनाची बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 08:00 AM2021-09-15T08:00:22+5:302021-09-15T08:01:39+5:30
१५० किलोमीटवर अंतर होणार कमी, ई-वाहनांसाठी ४ लेन राखीव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जाेडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे बनविला जात आहे. तब्बल १ लाख काेटी रुपये खर्च करून हा ८ पदरी महामार्ग बांधण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्प्रेस-वेमुळे हे अंतर १५० किलोमीटरने कमी होणार असून केवळ मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांमध्येच पूर्ण होणार आहे.
केंद्रीय महामार्ग विकास आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की देशातील दाेन प्रमुख महानगरांना जाेडणारा १३५० किलाेमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली अंतर १५० किलाेमीटरने कमी हाेणार आहे. तसेच वाहतुकीस अडथळे कमी असल्याने दरवर्षी ३२ काेटी लीटर इंधनाची बचत हाेईल, असा अंदाज आहे.
एक्स्प्रेस-वे पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हे अंतर केवळ १३ तासांमध्ये गाठता येईल. सध्या एक्स्प्रेस-वेचे ३५० किलाेमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
संपूर्ण काम झाल्यानंतर केवळ वेळच वाचणार नाही, तर बाजूने औद्याेगिक टाउनशिप आणि स्मार्ट शहरेही उभारण्याची याेजना आहे. संपूर्ण मार्गात ९२ ठिकाणी इंटरव्हल स्पाॅट विकसित करण्यात येणार आहेत.
ई-वाहनांसाठी ४ लेन राखीव
- एक्स्प्रेस-वेवर ८ लेन असून त्यापैकी दाेन्ही बाजूने प्रत्येकी दाेन, अशा चार लेन फक्त ई-वाहनांसाठी राहणार आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिला एक्स्प्रेस-वे राहणार आहे. त्यामुळे एकप्रकारे हा पर्यावरणपूरक एक्स्प्रेस-वे ठरणार आहे. यामुळे इंधनाचीही माेठी बचत हाेणार आहे.
- महामार्गाचा २४५ किलाेमीटरचा मार्ग मध्य प्रदेशातून जाताे. तेथे १०० किलाेमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची महामार्ग विकास आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून १६ सप्टेंबरला पाहणी करण्यात येणार आहे.
- महामार्गाऐवजी स्लिप लेनमध्ये टाेल प्लाझा बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या शहरात प्रवेश करायचा आहे, तेवढाच टाेल आकारण्यात येईल.
- चार लेन या फक्त ई-वाहनांसाठी राहणार आहेत. त्यांच्यासाठी महामार्गावर ठराविक अंतरावर चार्जिंगची साेय राहणार आहे.