मुंबई-दिल्ली जगातील व्यस्त हवाई मार्गांच्या यादीत; ४.८ लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:35 AM2021-10-18T08:35:23+5:302021-10-18T08:35:35+5:30
हवाई वाहतुकीचे मानांकन करणाऱ्या ब्रिटनस्थित ‘’ओएजी’’ या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबई-दिल्ली मार्गाने जगातील सर्वात व्यस्त हवाई मार्गांच्या यादीत स्थान मिळविले आहे. कोरोना काळात एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्राचे चाक खोलात असताना, ही सुवार्ता समोर आल्याने आशेचा किरण दिसत आहे.
हवाई वाहतुकीचे मानांकन करणाऱ्या ब्रिटनस्थित ‘’ओएजी’’ या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सर्वात व्यस्त देशांतर्गत हवाई मार्गांच्या क्रमवारीत मुंबई-दिल्ली मार्गाला दहावे स्थान प्राप्त झाले आहे. कोरोना काळात हा एकमेव मार्ग विमान कंपन्यांसाठी तारणहार ठरला. चालू महिन्यात मुंबई-दिल्ली मार्गावरून तब्बल ४.८ लाख प्रवाशांनी ये-जा केली.
अहवालानुसार, भारतात दिल्ली विमानतळाने सर्वाधिक प्रवासी हाताळले. त्यामुळे जगभरातील व्यस्त विमानतळांच्या यादीत दिल्लीला दहावे स्थान प्राप्त झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात २७८.४ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला आहे. २०१९ मध्ये दिल्लीचे स्थान या यादीत १४ वे होते.
भारतातून आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडणाऱ्या एकाही मार्गाला या यादीत स्थान मिळालेले नाही. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर गेल्या दीड वर्षांपासून लागू असलेल्या निर्बंधांचा हा परिणाम असल्याचे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे.