मृत्यूचा थरार! 153 विमान प्रवाशी, 5 मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 10:51 AM2019-07-17T10:51:33+5:302019-07-17T10:52:09+5:30
चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला
लखनऊ - मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या विस्तारा विमानातील इंधन संपुष्टात आल्याने 153 प्रवाशांचे जीव टांगणीला लागले होते. जवळपास 4 तास हे विमान हवेत उड्डाण घेत असल्याने इंधन टाकीत फक्त पाच मिनिटं पुरेल इतकं इंधन असल्याने या विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मुंबईहूनदिल्लीला जाणारं हे विमान पहिल्यांदा लखनऊ येथे वळविण्यात आलं. त्यानंतर या विमानाला प्रयागराजला पाठविण्यात आलं. लखनऊवरुन प्रयागराजला गेल्यानंतर पुन्हा विमानाला लखनऊला बोलविण्यात आलं. अंधूक प्रकाशामुळे विमानाच्या लँडिंगला अडचण निर्माण झाली होती. अखेर पायलटने इमरजेन्सी संदेश पाठवल्यानंतर विमानाला लखनऊ येथील विमानतळावर उतरविण्यात आलं त्यावेळी विमानातील इंधन जवळपास संपलेले होतं.
चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला. लखनऊ ते प्रयागराज येथील बमरौली विमानतळ जवळपास 200 किमी अंतरावर आहे. हे अंतर पार करण्यासाठी विमानात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध नव्हता. प्रयागराजच्या मार्गावर सात किमी गेल्यानंतर या विमानाला पुन्हा लखनऊला बोलविण्यात आलं. जेथे 20 मिनिटांच्या कालावधीत या विमानाचं लँडिंग करण्यात आलं.
#TravelUpdate: Flight UK 944 from Mumbai to Delhi has been diverted to Lucknow due to air traffic congestion as a result of bad weather in Delhi. Please visit https://t.co/9eL33N630U or SMS UK <flight no> to 9289228888 for updated flight status. Thank you.
— Vistara (@airvistara) July 15, 2019
विमानाला पुन्हा लखनऊला आणण्याबाबत पायलटला विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने कळविलं. लखनऊ येथील वातावरण चांगले झाले असून विमान लखनऊला उतरवू शकता. त्यानंतर पायलटने विमान लखनऊला वळविले. जेव्हा विमानाचं लखनऊला लँडिंग झालं तेव्हा विमानात 200 किलोग्रॅम म्हणजे 5 मिनिटे उड्डाण होईल इतकं इंधन शिल्लक होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ए 320 UK 944 हे विमान मुंबईहून दुपारी 2.40 वाजता 8, 500 किलो इंधनासह दिल्लीसाठी रवाना झाली. मुंबई ते दिल्ली यातील विमान प्रवासाचं अंतर दोन तासाचं आहे. या प्रकरणावर विमान प्राधिकरणाने चौकशीचे आदेश दिले आहेत. एका ज्येष्ठ पायलटने या घटनेवर सांगितले की, हा एक चमत्कार आहे विमान लँडिंग होणं. विमानातील इंधनसाठा कमी असताना लखनऊवरुन विमान पुन्हा प्रयागराज वळविण्यात आलं ही भयंकर मोठी चूक आहे. दिल्लीत खराब वातावरण आणि अंधूक प्रकाशामुळे जवळपास 75 मिनिटं हे विमान हवेत घिरक्या घेत होतं. त्यानंतर पायलटने लखनऊ विमानतळावर विमान वळविण्याचा निर्णय घेतला होता.