अपघातांमध्ये मुंबई प्रथम
By admin | Published: June 10, 2016 04:16 AM2016-06-10T04:16:11+5:302016-06-10T08:14:35+5:30
रस्ते अपघातात मुंबई प्रथम क्रमांकावर, मात्र मृतांच्या संख्येत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे
नवी दिल्ली : रस्ते अपघातात मुंबई प्रथम क्रमांकावर, मात्र मृतांच्या संख्येत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये मुंबईत सर्वाधिक २३,४६८ रस्ते अपघात झाले, तर दिल्लीत सर्वाधिक १,६२२ अपघाती मृत्यू झाले. २०१५ मध्ये देशभरात पाच लाख रस्ते अपघात झाले. त्यात १.४६ लाख लोक ठार झाले. २०१५ मध्ये १३ राज्यांत ८७.२ टक्के रस्ते अपघात झाले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ७९,७४६ लोक जखमी झाले. या यादीत कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, आंध्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, ओडिशा, पश्चिम बंगाल यांचाही समावेश आहे.
२०१५ मधील पाच लाख रस्ते अपघातांपैकी एकतृतीयांश अपघात दुचाकीशी संबंधित आहेत. २८.४ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर, २४ टक्के अपघात राज्यमार्गावर आणि ४७.६ टक्के अपघात अन्य मार्गांवर झाले. मरण पावलेले ३५ टक्के लोक राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातातील आहेत, यात जखमी २९ टक्के आहेत.
दुपारी ३ ते सायंकाळी ६, तसेच सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान १७ टक्के अपघात झाल्याचे हा अहवाल म्हणतो. ‘हिट अँड रन’ची ५७,०८३ प्रकरणे घडली. रस्ते अपघातात हे प्रमाण ११.४ टक्के आहे, अशा अपघातांत २०,७०९ लोक मरण पावले.