मोदींच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या फहमिदा हसन कोण आहेत? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:22 AM2022-04-26T11:22:21+5:302022-04-26T12:47:03+5:30

राज्यात हनुमान चालिसा वादात शिवसेना भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फहमिदा हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा आणि दुर्गा पठण करण्याची परवानगी मागितल्यानंतर चर्चेत आल्या आहेत. फहमिदा या राष्ट्रवादीच्या मुंबई-उत्तर जिल्हा कार्याध्यक्षा आहेत.

Mumbai Hanuman Chalisa Row Know Who Is Fahmida Hasan Khan Want To Chant Hanuman Chailsa Outside Pm Modi Residance | मोदींच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या फहमिदा हसन कोण आहेत? 

मोदींच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या फहमिदा हसन कोण आहेत? 

googlenewsNext

मुंबई-

महाराष्ट्रात अजान आणि हनुमान चालिसावरुन सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर सुरू झालेला हनुमान चालीसाचा वाद आता भाजपा व्हाया शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून झालेल्या वादामुळे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा सध्या तुरुंगात आहेत. आता राष्ट्रवादीच्या नेत्या फहमिदा हसन यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा आणि दुर्गा पाठ करण्याची परवानगी मागितली आहे. जाणून घेऊया काय आहे हा संपूर्ण वाद आणि कोण आहे फहमिदा हसन?

फहमिदा या मुंबई उत्तर जिल्ह्याच्या NCP च्या कार्याध्यक्ष
फहमिदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई-उत्तर जिल्हा कार्याध्यक्षा आहेत. फहमिदा या मुंबईतील कांदिवली भागात राहतात. राजकारणासोबतच फहमिदा सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. फहमिदा यांच्या फेसबुक पेजवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यासोबतची अनेक छायाचित्रेही आहेत. ट्विटरवरही फहमिदा अनेकदा त्यांच्या राजकीय घडामोडींचे फोटो शेअर करत असतात.

फहमिदा उत्तर मुंबई जिल्ह्यातील लोकांमध्ये खूप सक्रिय आहे. लोक त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात. एसआरए योजनेत बिल्डरच्या फसवणुकीप्रकरणी गेल्या वर्षीच एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे पोहोचले होते. रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. याशिवाय त्या परिसरात सुरू असलेली अवैध कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनासमोर आणत असतात.

असं सुरू झालं संपूर्ण प्रकरण..
महाराष्ट्रातील हा संपूर्ण वाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या एका भाषणानंतर सुरू झाला असे म्हणता येईल. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेत अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी ३ मे ची मुदत देखील दिली आहे. यासोबतच त्यांनी हिंदू संघटनांना हनुमान चालिसाचे पठण करण्याचे आवाहनही केले. तेव्हापासून हनुमान चालिसा वाद महाराष्ट्रातून यूपीपर्यंत पसरला आहे. 

खासदार नवनीत राणा यांना पतीसह मुंबईत अटक
राज ठाकरेंच्या आवाहनानंतर हनुमान चालीसाचा मुद्दा राज्यात तापला. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी राणांविरोधात निदर्शने केली. संध्याकाळी पीएम मोदींच्या कार्यक्रमाचा दाखला देत खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या पतीसह हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम पुढे ढकलला. मात्र, नंतर पोलिसांनी त्यांना धार्मिक उन्माद पसरवल्याबद्दल अटक केली. रविवारी न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Mumbai Hanuman Chalisa Row Know Who Is Fahmida Hasan Khan Want To Chant Hanuman Chailsa Outside Pm Modi Residance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.