Rain and Railway Updates: पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग! मुंबई लोकल उशिराने; देशभरातील १४७ रेल्वे गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:55 AM2022-07-06T11:55:21+5:302022-07-06T11:56:32+5:30
पावसाचा जोर पुढील ३-४ दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज
Rain and Railway Updates: मुंबई आणि आसपासच्या परिसरात मंगळवारप्रमाणेच बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर तसेच अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. रस्ते आणि ट्रॅकवरील रेल्वे गाड्या, वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. पावसाचा तडाखा केवळ मुंबई, महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशभरात विविध भागाला बसत आहे. परिणामी, मुंबई लोकल अद्याप सुरू असली तरी उशिराने धावत आहे. तर देशभरातील लांब पल्ल्याच्या एकूण १४७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील काही स्टेशनमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. कुर्ला जवळ रुळांवर पाणी साचल्याने मुंबई लोकल ट्रेनच्या सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकल सेवा सुरू असली तरीही अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. याशिवाय, देशभरात धावणाऱ्या १४७ ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १९ गाड्यांचे सुरूवातीचे स्टेशन (Starting Point) बदलण्यात आले आहे. तर १६ गाड्यांचे थांबे (Stops) करण्यात आले आहेत. या सर्व ट्रेन्स वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बिहार, यूपी आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पावसाबाबत बोलायचे झाल्यास मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी पाऊस पडत असून दिवसभर पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. कोल्हापूरातील पूरपरिस्थिती होऊ शकेल अशा ठिकाणी आधीच NDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे. रायगड जिल्ह्यातील २६ गावांतील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.