तालिबानच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर रेडइंक 'जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 12:42 PM2021-12-30T12:42:00+5:302021-12-30T12:42:10+5:30
भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही रमन यांनी सिद्दीकींना "शोध आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील त्यांच्या कार्याबद्दल" हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिशची पत्नी फ्रेडरिक सिद्दीकी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुंबई: बुधवारी मुंबईत मुंबई प्रेस क्लबतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अफगाणिस्तानमध्ये काम करताना आपला जीव गमावलेले फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर 'जर्नालिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार-2020 देण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वार्षिक 'रेडइंक अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम' प्रदान केले.
दानिश यांची छायाचित्रे कादंबरी होती
एन.व्ही. रमन यांनी सिद्दीकींना त्यांच्या तपासात्मक आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील कामाबद्दल प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिश सिद्दीकींची पत्नी फ्रेडरिक सिद्दीकी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दानिश यांना श्रद्धांजली वाहताना सरन्यायाधीश म्हणाले, "दानिश या काळातील अग्रगण्य छायाचित्र पत्रकार होते. एखादे चित्र हजार शब्द बोलते, पण दानिश यांची चित्रे कादंबरी होती.''
प्रेम शंकर झा यांना जीवनगौरव
दरम्यान, या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रेम शंकर झा (83) यांना "तीक्ष्ण आणि विश्लेषणात्मक लेखनाच्या दीर्घ आणि प्रतिष्ठित कारकिर्दीसाठी" जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झा यांचे अभिनंदन करताना सरन्यायाधीश म्हणाले, "झा यांचे कठोर परिश्रम, सर्वोच्च नैतिक दर्जा आणि प्रचंड बुद्धी अतुलनीय आहे."
10 वर्षांपूर्वी पुरस्काराची स्थापना
मुंबई प्रेस क्लबने दशकापूर्वी शोध आणि वैशिष्ट्यपूर्ण लेखनाला ओळखण्यासाठी आणि देशातील पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी 'द रेडइंक अवॉर्ड्स'ची स्थापना केली होती. सिद्दीकी आणि झा व्यतिरिक्त, इतर अनेक पत्रकारांना 12 श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले.