कर्नाटकातल्या काँग्रेस-JDSचे 10 आमदार मुंबईत; येडियुरप्पा म्हणाले, वेट अँड वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 12:43 PM2019-07-07T12:43:40+5:302019-07-07T12:44:02+5:30
कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय.
नवी दिल्लीः कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय. शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत.
या प्रकारावर माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकातील भाजपाचे वरिष्ठ नेते येडियुरप्पा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांना उद्देशून म्हणाले, आपल्याला राजकीय घडामोडींबद्दल माहितीच आहे. मी आता तुमकूरला जातोय आणि संध्याकाळी 4 वाजता परतणार आहे. सध्या आपण प्रतिज्ञा करा, मी कुमारस्वारी आणि सिद्धरामय्यांच्या विधानावर काहीही बोलणार नाही.
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.
BS Yeddyurappa, BJP in Bengaluru, #Karnataka : I am going to Tumkur and I will come back at 4 pm. You know about the political developments. Let's wait and see. I don't want to answer to what HD Kumaraswamy and Siddaramaiah say. I am nowhere related to this. pic.twitter.com/vYNbvKRcJQ
— ANI (@ANI) July 7, 2019
राजीनामे दिलेल्या काही आमदारांना राज्यपालांच्या भेटीनंतर मिनीबसमध्ये बसवून विमानतळावर नेण्यात आले. तेथून त्यांना चार्टर्ड विमानाने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात आले. राहुल गांधी यांच्या पदत्यागाने नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये कर्नाटकमधील या घटनांवर चर्चा करून परिस्थिती सावरण्यासाठी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना बंगळुरूला रवाना केले आहे. राज्यपालांकडून या सर्व आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास कर्नाटकमधील सरकारचे पडू शकते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव हे दोघेही राज्यात नसताना हा राजकीय भूकंप घडला. सर्व बंडखोर आमदार विधानसभाध्यक्ष रमेश कुमार यांच्या कार्यालयात पोहोचले, तेव्हा अध्यक्ष निघून गेले होते. ते परत येणार नाहीत हे नक्की झाल्यावर आमदारांनी राजीनामे विधिमंडळ सचिव व अध्यक्षांचे स्वीय सचिव यांच्याकडे सुपूर्द केले. नंतर या आमदारांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल वजुभाई गाला यांना राजीनाम्याची प्रत दिली होती.
Maharashtra: 10 Karnataka Congress-JD(S) MLAs are staying at Sofitel hotel in Mumbai. 11 Congress-JD(S) tendered their resignations yesterday in #Karnataka. pic.twitter.com/5mfmC7btRi
— ANI (@ANI) July 7, 2019
भाजपाचे नेते मंत्री सदानंद गौडा यांनी आघाडीचे सरकार पडल्यास बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन केले जाईल, असे सांगितले. येडियुरप्पा यांनी सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले की, अन्य पक्षांमधील या घडामोडींशी भाजपचा काही संबंध नाही. लोकांना पुन्हा निवडणुका नको आहेत. प्रसंगी सरकार स्थापण्याची शक्यता आन्ही आजमावून पाहू.