‘इसिस’च्या उद््ध्वस्त जाळ््याचे मुंबईतून नियंत्रण
By Admin | Published: January 28, 2016 01:24 AM2016-01-28T01:24:34+5:302016-01-28T01:24:34+5:30
गणराज्य दिनाचे समारंभ उधळून लावण्याची शक्यता लक्षात घेत आधीच छेडण्यात आलेल्या देशव्यापी धाडसत्रात इसिसशी संबंध असल्यावरून वेगवेगळ्या राज्यांतून ताब्यात घेण्यात
- नबीन सिन्हा, नवी दिल्ली
गणराज्य दिनाचे समारंभ उधळून लावण्याची शक्यता लक्षात घेत आधीच छेडण्यात आलेल्या देशव्यापी धाडसत्रात इसिसशी संबंध असल्यावरून वेगवेगळ्या राज्यांतून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व युवकांवर मुंबईतूनच नियंत्रण ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) तपासातून उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय आणि सदर तपास संस्थेने महाराष्ट्रातील गुप्तचर यंत्रणांना सतर्क केले आहे.
इसिसशी संबंधित सर्व १९ युवकांचा रिंग लिडर मानला जाणारा युसूफ हा मुंबईत वास्तव्याला होता. त्याने प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची योजना आखली होती. लखनौत ज्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या त्या वाजवान अहमद याने महाराष्ट्रातील जंगलांमध्ये रेकी पार पाडली होती.
संघटनेचे नाव ‘जुंदाल खिलाफा’
किमान ७० युवकांना पूर्णपणे जहाल बनविण्यासाठी त्यांच्यावर वैचारिक पगडा घालण्यासह त्यांना शस्त्रे पुरविण्याचे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम ‘जुंदाल खलिफा’ या नव्या संघटनेच्या नावाखाली केले जाणार होते, असे एनआयएच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. अटक झालेल्या सर्व युवकांनी एक तर इसिस किंवा अन्य दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. लखनौत अटक झालेला वाजवान आणि बेंगळुरु येथून पकडण्यात आलेला अन्य एक युवक हवाला व्यवहारात व्यग्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले. देशाच्या विविध भागात मोठे नेटवर्क उभारण्याची त्यांची योजना होती. लवकरच शस्त्रे आणि दारुगोळ्यासह बॉम्ब बनविण्याची सामग्री मिळण्याची त्यांना अपेक्षा असतानाच ते अडकले.
अटक झालेले सर्व युवक २४ ते २७ वर्षे वयोगटातील असून त्यांना इसिसशी संबंध असल्याबद्दल कोणताही खेद वा खंत नाही. या सर्वांना कट्टर बनविण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी अटक झालेले सर्व १९ युवक टेक्नोसॅव्ही असून त्यांनी सांकेतिक शब्दांचा वापर करीत आपल्या म्होरक्यांशी स्काईपवर संपर्क साधला होता. हे सर्व जण अब्दुस हाफिजच्या नियमित संपर्कात होते.
अन्य राज्यांनाही सतर्कतेचा इशारा
-केंद्रीय गृहमंत्रालयाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना इसिस आणि अन्य संघटनांच्या कारवायांबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. प. बंगाल, झारखंडसारख्या राज्यांमध्येही दहशतवादी गट सक्रिय बनू शकतात.
-स्थानिक संपर्काच्या माध्यमातून या संघटना बनावट चलनी नोटा तयार करण्यासारख्या कारवायांना वेग देण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले.
-अटक केलेल्या काही युवकांची आणखी चौकशी केली असता लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद किंवा तालिबानसारख्या संघटनांशी संबंध उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्यावरून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन युवकांना नंतर सोडण्यात आल्याची माहितीही एनआयएच्या सूत्रांनी दिली.