Sudhir Mungantivar: मुंबईचा वाघ गुजरातला जाणार, वनमंत्र्यांनी सांगितला करारनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:10 AM2022-09-27T11:10:24+5:302022-09-27T11:11:21+5:30
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी गुजरातच्या दौऱ्यावर होते
मुंबई - राज्यातील वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्यावरून मोठा वाद सुरू आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरलं असतानाच आता महाराष्ट्राचा वाघहीगुजरातमध्ये जाणार आहे. मात्र, वाघाच्या बदल्यात महाराष्ट्राला सिंहाची जोडी मिळणार आहे. गुजरातमधील सिंहांची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत करार झाला असून लवकरच केंद्राकडूनही त्यास मंजूरी घेण्यात येईल.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी गुजरातच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर वाघ आणि सिंहाच्या करारासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातून लुप्त झालेला सर्वात वेगवान प्राणि चिता हा भारतात आणला. त्यानंतर आता गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार आणि बोरीवलीचा वाघ गुजरातमध्ये जाणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव अवंतिका सिंह यांना मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण असलेला राष्ट्रध्वज भेट दिला.
बोरीवलीच्या वाघासंदर्भातील प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव ) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. ४ एप्रिल २०२२ रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी. मल्लिकर्जुन यांनी सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.
दरम्यान, अखेर या प्रश्नी सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी सोमवारी विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करणार असल्याचे निश्चित करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.