पालिका सचिवांना खोलीत कोंडले, महापौरांच्या आसनावर चढले नगरसेवक, दिल्ली MCD मध्ये रणकंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:21 PM2024-01-15T22:21:29+5:302024-01-15T22:21:46+5:30
Delhi MCD News: दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा जोरदार राडा झाला आहे. महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र परिस्थिती अशी उद्भवली की, बैठक सुरू करणंच कठीण झालं.
दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा जोरदार राडा झाला आहे. महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र परिस्थिती अशी उद्भवली की, बैठक सुरू करणंच कठीण झालं. महापौर त्यांच्या आसनावर विराजमान झाल्यानंतर आक्रमक झालेले भाजपाचे नगरसेवक त्यांच्या आसनाकडे धावले आणि टेबलावर उभे राहिले.
हा गोंधळ इथेच थांबला नाही तर सभागृहाचं कामकाज सुरू होऊ नये म्हणून, भाजपाच्या नगरसेवकांनी महानगरपालिका सचिव शिवप्रसाद के.व्ही. यांच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर त्यांना कार्यालयातच कोंडून तिथेच आंदोलन करण्यास सुरुवात केली. आम आदमी पक्ष चुकीच्या पद्धतीने स्थायी समितीच्या शक्तींचं हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे बेकायदेशीर आहे. असा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला. दरम्यान, या कृत्यावरून आम आदमी पक्षाने भाजपावर टीका केली आहे. तसेच ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला.
दिल्लीच्या महानगरपालिकेमध्ये आप आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची ही काही पहिली घटना नाही. सभागृहाच्या पहिल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. तिथून सुरू झालेला वाद अजूनही सुरू आहे. विरोधी नगरसेवक हे महापौर शैली ओबेरॉय यांच्या आसनासमोरील टेबलावर चढले. तसेच त्यांनी कामकाजाची कागदपत्रे फाडली. महानगरपालिकेच्या १८ सदस्यीय स्थायी समितीचं पुनर्गठन गेल्या १० महिन्यांपासून प्रलंबित आहे.
आज महापौर ओबेरॉय यांनी सभागृहात प्रवेश करताच भाजपा नगरसेवकांनी हुकूमशाही चालणार नाही. संविधानाची हत्या बंद करा, अशा घोषणा देण्यास सुरू केली. तसेच प्रस्तावाचे कागद फाडले. तसेच फाटलेले तुकडे हवेत भिरकावले.