महाराष्ट्रात केली हत्या, थायलंडमध्ये पळण्याची तयारी, दिल्लीत पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दहशवाद्याला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 22:44 IST2025-03-08T22:43:37+5:302025-03-08T22:44:50+5:30
International Terrorist Arrest: महाराष्ट्रात हत्या करून थायलंडमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला पंजाब पोलिसांनी दिल्लीतील इंदिरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत.

महाराष्ट्रात केली हत्या, थायलंडमध्ये पळण्याची तयारी, दिल्लीत पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दहशवाद्याला ठोकल्या बेड्या
महाराष्ट्रात हत्या करून थायलंडमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला पंजाब पोलिसांनी दिल्लीतील इंदिरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेट, मोहालीने अटक केलेल्या या दहशतवाद्याचं नाव सचिनदीप सिंग असं आहे. तो पंजाबधील अमृतसर येथील डायलपुरा गावातील रहिवासी आहे. हा दहशतवादी १० फेब्रुवारी रोजी नांदेड येथे झालेल्या हत्याकांडामध्ये सहभागी होता.
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, सचिन हा अटकेपासून वाचण्यासाठी थायलंडमध्ये पळण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो पंजाबमधून दिल्लीत आलाहोता. मात्र पोलिसांनी दिल्ली विमानतळावर त्याला बेड्या ठोकल्या. सचिनदीप सिंग हा बब्बर खालसा इंटरनॅशनल दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता. तसेच त्याचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.
सचिनदीप सिंग हा पाकिस्तानमध्ये असलेला दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा आणि अमेरिकेत असलेला बब्बर खालसा इंटरनॅशलनचा ऑपरेटिव्ह हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी पासिया याच्या मार्गदर्शनानुसार काम करत होता. तो दहशतवादी संघटनेतील गुंड आणि शूटर्सना आश्रय देण्याचं आणि रसद व अर्थसहाय्य मिळवून देण्याचं काम करायचा.