१२ पेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्काऱ्यास मृत्युदंड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:58 PM2018-07-23T23:58:57+5:302018-07-24T06:46:18+5:30
फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, दोन महिन्यांत तपास पूर्ण होणार
नवी दिल्ली : १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक २०१८ सोमवारी लोकसभेत सादर करण्यात आले.
गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले. विधेयकाच्या उद्देश आणि कारणात स्पष्ट करण्यात आले आहे की, १६ वर्षे आणि १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील बलात्काराच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. अल्पवयीन मुलींबाबत क्रूरता आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यासंबंधीच्या विधेयकांत तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यात म्हटले आहे की, बलात्काराच्या गुन्ह्यासाठीचा दंड ७ वर्षांच्या किमान कारावासाऐवजी वाढवून १० वर्षे करण्यात आला आहे. याला वाढवून आजीवन कारावासही केला जाऊ शकतो. १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. यातही आजीवन कारावास केला जाऊ शकतो. १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. यात आजीवन कारावासही होऊ शकतो अथवा मृत्यूदंडही ठोठाण्यात येऊ शकतो. बलात्काराच्या सर्व प्रकरणातील तपास पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल.