अनैतिक संबंधातून IAF अधिका-याची हत्या, मृतदेहाचे केले तुकडे
By admin | Published: February 22, 2017 09:38 AM2017-02-22T09:38:44+5:302017-02-22T09:38:44+5:30
हवाई दल अधिका-याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना भतिंडा जवळच्या भीसीआना हवाई तळावर घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
भतिंडा, दि. 22 - सहका-याच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध ठेवणा-या हवाई दल अधिका-याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना भतिंडा जवळच्या भीसीआना हवाई तळावर घडली. विपन शुक्ला (27) असे मृत अधिका-याचे नाव आहे. विपनचे हवाई दलात सार्जंट असलेल्या सुलेश कुमारची पत्नी अनुराधा पटेलबरोबर प्रेमसंबंध होते.
त्यातून सुलेश त्याची पत्नी अनुराधा आणि मेहुणा शशी भूषण या तिघांनी मिळून विपनची हत्या केली. भूषण बहिण अनुराधाला भेटायला आलेला असताना हा गुन्हा घडला. 8 फेब्रुवारीच्या रात्री तिघांनी मिळून विपनची हत्या केली. विपन शुक्लाची पत्नी कुमकुमने 9 फेब्रुवारीला बालुआना पोलिस स्थानकात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिस श्वानांच्या मदतीने हवाई तळावरील निवासस्थानांच्या ठिकाणी शोध घेत असताना श्वान त्यांना सुलेश कुमारच्या घरी घेऊन गेले. तिथे सुलेश कुमारच्या घरातील कपाट आणि फ्रिजमधून 16 प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले विपन शुक्लाच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. विपनची 2014 मध्ये भीसीआना हवाई तळावर नियुक्ती झाली होती. त्याने इथे पत्नीला सोबत आणले नव्हते.
त्या दरम्यान त्याची अनुराधा पटेलशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांमध्ये शरीरसंबंध निर्माण झाले. अनुराधाने विपनला लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने नकार दिला. अखेर तिने पती सुलेशला त्यांच्यामध्ये असलेल्या संबंधांबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी विपनच्या हत्येचा कट रचला. सुलेशने 8 फेब्रुवारीला विपनला आपल्या घरी बोलावले. तिथे तिघांनी मिळून विपनची हत्या केली आणि एका लोखंडी पेटीत त्याचा मृतदेह टाकला. सुलेश 19 फेब्रुवारीला दुस-या निवासस्थानी रहायला गेला. तिथे त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन 16 बॅग्समध्ये भरले व बॅग फ्रिजमध्ये ठेवली.