काश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्या; शाळेतच घातल्या गाेळ्या, दहशतवाद्यांचे संतापजनक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 06:57 AM2022-06-01T06:57:29+5:302022-06-01T06:57:39+5:30
गाेपालपाेरा येथील शासकीय शाळेत ३६ वर्षीय रजनी बाला यांची नियुक्ती झाली.
जम्मू : कुलगाम जिल्ह्यातील गाेपालपाेरा भागात दहशतवाद्यांनी रजनी बाला या काश्मिरी पंडित शिक्षिकेची शाळेमध्येच गाेळ्या घालून हत्या केली. २० दिवसांमध्ये टार्गेट किलिंगची ही तिसरी घटना आहे. या घटनेनंतर काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत.
गाेपालपाेरा येथील शासकीय शाळेत ३६ वर्षीय रजनी बाला यांची नियुक्ती झाली. सकाळी दहशतवादी शाळेमध्ये शिरले आणि त्यांनी
रजनी बाला यांच्यावर गाेळीबार केला. एक गाेळी रजनी बाला यांच्या डाेक्यात लागली हाेती. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र, तेथे त्यांना मृत घाेषित करण्यात आले.
रजनी बाला यांची काश्मिरातील विस्थापित काश्मिरी हिंदूंची वापसी आणि पुनर्वसनासाठी जाहीर करण्यात आलेल्या राेजगार पॅकेजअंतर्गत दाेन वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आली हाेती. त्या मूळच्या जम्मू भागातील सांबा जिल्ह्याच्या चवलगाम कुपवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहत हाेत्या.
२० दिवसांमध्ये तिसरे टार्गेट किलिंग
दहशतवाद्यांनी १२ मे राेजी बडगाम जिल्ह्यात चदुरा येथील तहसील कार्यालयात राहुल भट यांचीही हत्या केली हाेती. २५ मे राेजी स्थानिक
टीव्ही कलाकार आमरिन भट यांचीही गाेळ्या घालून हत्या करण्यात आली हाेती. टार्गेटेड किलिंगच्या घटनांनंतर काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
फारुख अब्दुल्लांची वादग्रस्त प्रतिक्रिया
नॅशनल काॅन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी याप्रकरणी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली असून आता सर्वजण मारल्या जातील, असे ते म्हणाले.