मुरली मनोहर जोशींनी घेतली अडवाणींची भेट, सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:08 IST2019-04-05T16:08:08+5:302019-04-05T16:08:58+5:30
लोकसभा निवडणूक लढवत नसलेले ज्येष्ठ भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली

मुरली मनोहर जोशींनी घेतली अडवाणींची भेट, सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा?
नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या वाढत्या वयाचा हवाला देऊन उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पक्षस्थापनेपासून सक्रिय असलेले अनेक नेते नाराज झाले आहे. दरम्यान, यावेळी निवडणूक लढवत नसलेले ज्येष्ठ भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने यावेळी उमेदवारी दिलेली नाही. उमेदवारी नाकारली गेल्यानंतर या नेत्यांना आपली नाराजी लपवता आलेली नाही. लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवारी संध्याकाळी नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स, सेल्फ लास्ट' असे शीर्षक असलेला एक ब्लॉग प्रकाशित करून पक्षातील नव्या नेतृत्वाला उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुरली मनोहर जोशी यांनी आज सकाळी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. दरम्यान, या चर्चेचा अधिक तपशील समोर येऊ शकलेला नाही.