'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:50 IST2025-04-19T16:48:19+5:302025-04-19T16:50:55+5:30

Hindu Women, Murshidabad Violence West Bengal: बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अनेक हिंदू कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

murshidabad violence hindu women cried families displaced demand bsf camp governor c v ananda bose | 'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल

'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल

Hindu Women, Murshidabad Violence West Bengal: पश्चिम बंगालमधीलमुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. या गोंधळात अनेक हिंदू कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक हिंदू कुटुंबांना आपली आयुष्याची कमाई तशीच सोडून मदतीसाठी उभारलेल्या छावण्यांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. हिंसाचाराच्या तडाख्याने बेघर झालेल्या कुटुंबांना भेटायला जाणाऱ्या लोकांना तेथील महिला रडत रडत एकच सवाल करत आहेत की, हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? शुक्रवारी बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुर्शिदाबादला भेट दिली. त्यानंतर ते जाफराबादलाही गेले. या दौऱ्यात त्यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.

बंगालचे राज्यपाल आल्याने कुटुंबातील महिलांना थोडेसे हायसे वाटले. मात्र राज्यपालांना पाहून काही महिलांना भावना अनावर झाल्या. त्या स्वत:ला एक प्रश्न विचारण्यापासून रोखू शकल्या नाहीत. त्या सर्व महिला एकच प्रश्न विचार होत्या, हिंदू असण्यात आमचा काय गुन्हा आहे... तसेच  'आम्हाला वाचवा' अशा विनवण्याही करत होत्या. बाधित कुटुंबातील काही महिलांनी तर थेट राज्यपालांचे पाय धरले आणि त्यांच्याकडून मदतीची याचना केली. यावेळी राज्यपालांनी पीडित महिला आणि कुटुंबांना धीर दिला आणि शांतता राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

हिंसाचाराचे बळी ठरलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटले राज्यपाल

राज्यपालांनी जाफराबाद येथे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या हरगोबिंद दास आणि चंदन दास यांच्या घरांना भेट दिली. राज्यपालांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि हिंसाचार करणाऱ्याना शासन करण्याचे आश्वासन दिले. योगायोगाने, एक दिवस आधी या भागात शांतता बैठक झाली होती. तेथील सत्ताधारी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना या भागात कायमस्वरूपी बीएसएफ कॅम्प उभारण्यास सांगण्यात आले होते. परिसरातील रहिवासी पुन्हा राज्यपालांसमोर तीच मागणी करताना दिसले.

बीएसएफ कॅम्पला जमीन देण्यास लोकांनीही तयारी दर्शवली. गरज पडल्यास आम्ही आमची घरेही बीएसएफ कॅम्पला देऊ असे त्यांनी सांगितले. याशिवाय महिला आयोगाच्या सदस्यांनीही पीडित महिलांशी संवाद साधला आणि त्याना धीर दिला. मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबल्या असल्या तरीही लोकांच्या मनात त्याबद्दल असलेली भीती स्पष्टपणे दिसते आहे.

Web Title: murshidabad violence hindu women cried families displaced demand bsf camp governor c v ananda bose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.