मस्कतमध्ये महिलांना गुलामांप्रमाणे विकले जाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:29 AM2018-07-28T01:29:12+5:302018-07-28T01:29:34+5:30
मुंबईच्या फरिदाने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सांगितल्या आपल्या व्यथा
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : अवैध पद्धतीने मस्कतला पाठवण्यात आलेल्या आणि तिथे गुलामासारखे बंदिस्त असलेल्या अंबरनाथच्या फरिदा यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना सांगितले की, तिथे महिलांना गुलामाप्रमाणेच विकले जाते.
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह फरिदा यांनी स्वराज यांची भेट घेतली. फरिदा म्हणाल्या की, भारतात जाण्याचा विषय काढताच, आपणास एक आठवडा उपाशी ठेवले. या सर्वामागे एक टोळी असून, त्या टोळीचा शिकार बनलो होतो. पंजाबमधील सुरजीत व चेन्नईतील बरकत उर्फ फातिमा हीही आमच्यासोबत होती.
सुषमा स्वराज यांना त्याची माहिती मस्कतहून कळवली जाताच, राज्य महिला आयोग परराष्ट्र मंत्रालयाने विमानाद्वारे त्यांना इथे आणण्याची व्यवस्था केली.
परदेशस्थ भारतीय विवाह तसेच महिला व मुलींची तस्करी या विषयावरील चर्चासत्रासाठी आलेल्या फरिदा यांना भेटल्यानंतर स्वराज म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत १ लाख ३६६ हजार भारतीयांना त्यांची जात, धर्म, पंथ न पाहता परदेशांतून परत आणण्यात आले आहे. अनधिकृत एजंटांची माहिती लोकांनीच प्रशासन व पोलिसांना द्यायला हवी. शिवाय, अधिकृत एजंटांची नावे परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत.
नवा कायदा
भारतामध्ये विवाह करून विदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी ठकसेन नवरदेवांची देशात असलेली संपत्ती जप्त करण्यासाठी कायदा करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. असे नवरदेव तसेच विदेशात पलायन केलेल्या अन्य आरोपींवर जारी करण्यात आलेली समन्स, वॉरंट यांची माहिती देणारी एक वेबसाइटही सुरू करण्यात येणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. अनिवासी ठकसेन नवरदेवांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या १५ हजार वधू एकट्या पंजाब राज्यामध्ये आहेत.
तस्करीचा नवा प्रकार
स्वराज म्हणाल्या की, अमेरिकेत शरणार्थीचा दर्जा मिळवून देतो, नंतर नागरिकत्व मिळेल, असे सांगून एजंट २५ ते ३0 लाख रुपये घेतात. त्यांना मेक्सिकोमार्ग अमेरिकेत नेतात.
तिथे पकडले जाताच, आपण राजकीय शरणार्थी असल्याचे सांगण्यास भाग पाडतात. त्यासाठी आमच्या कुटुंबाच्या जीवाला भारतात धोका असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस, भाजपा, आप सरकारकडून धोका असल्याची बतावणी केली जाते.
गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे ५२, १0१ व ३४0 प्रकरणे उघडकीस आली आहेत.