म्युझियमचं नाव बदललं आता छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यातील कनेक्शन शोधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:30 PM2020-09-17T12:30:21+5:302020-09-17T12:33:20+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यामधील नातं शोधण्यासाठी अधिकारी पुरावे गोळा करत आहेत.
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला निधीची कमतरता आणि वाढणारा खर्च यामुळे विलंब झाला. परंतु आता एक नवीन समस्या निर्माण झाल्यामुळे या बांधकामासाठी आणखी काही काळ विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यामधील नातं शोधण्यासाठी अधिकारी पुरावे गोळा करत आहेत. मुघलांच्या गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला उत्तर प्रदेशात स्थान नाही, असं सांगत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संग्रहालयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवलं. यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जानेवारी २०१६ मध्ये या बांधकामाचं भूमिपूजन केले. ताज महलच्या पूर्व गेटपासून दीड किमी अंतरावर हे म्युझियम उभं राहणार आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या प्रकल्पासाठी १४१ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित होता. २ वर्षात हे म्युझियम उभं राहणार होते. पण आतापर्यंत ७० टक्के कामकाज पूर्ण झालं आहे यासाठी ९० कोटींचा खर्च आला आहे. जीएसटी आणि कालावधी वाढल्याने बांधकामाचा खर्च जवळपास १७० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या बांधकामासाठी लागणारं साहित्य २०० किमी दूर नोएडावरुन आणवं लागत आहे. महापालिकेने हे संग्रहालय बांधण्याची जबाबदारी घेतली पण अर्थ विभागाकडून कोणताही अतिरिक्त खर्च निधी आला नाही.
संग्रहालयाचं नाव बदलल्यानंतर आग्रा पर्यटन विभागाचे अधिकारी अमित श्रीवास्तव म्हणाले की, शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यात निश्चितपणे लिंक आहे. औरंगजेबाच्या काळात आग्रा किल्ल्यात शिवाजी महाराजांना कैद केले होते. पण धाडसाने त्यांनी याठिकाणाहून सुटका मिळवण्यास यशस्वी झाले. आग्रातील भीमराव आंबेडकर विभागाच्या इतिहासकारांशी चर्चा करुन शिवाजी महाराज आणि आग्रा यांच्यातील घटनांची लिंक शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या म्युझियमला जास्तीत जास्त आणखी १ वर्षचा विलंब होऊ शकतो.
तर आंबेडकर विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक बी. डी शुक्ला यांनी सांगितले की, १६६६ मध्ये आग्रा येथे शिवाजी महाराज आले होते. शिवाजी महाराजांनी त्यांचे सर्व किल्ले गमावले होते, त्यानंतर औरंगजेब यांच्या सांगण्यावरुन ते आग्रा येथे भेटीला आले. तेव्हा महाराजांना अपमानास्पद वर्तवणूक दिल्यामुळे त्यांना राग आला. दरबारातील घटनेनंतर राम सिंह कोठीमध्ये शिवाजी महाराजांना बंदी करण्यात आले. पण ही राम सिंह कोठी आग्र्यात कुठे आहे याचा एएसआय आणि इतिहासकारांना थांगपत्ता नाही. शिवाजी महाराज यशस्वीपणे आग्राहून सुटले, शिवाजी महाराज आग्र्यात कुठे कुठे गेले यासाठी संशोधन सुरु आहे असं त्यांनी सांगितले.