पाच गँगस्टर्सनी रचला मुसेवालाच्या हत्येचा कट, तपासातून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 08:11 AM2022-06-18T08:11:23+5:302022-06-18T08:12:56+5:30
Sidhu Moose wala Murder: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट पाच गँगस्टर्सनी रचला. यात लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, सचिन थापर, अनमोल बिश्नोई व विक्रम बराडचा समावेश आहे.
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट पाच गँगस्टर्सनी रचला. यात लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, सचिन थापर, अनमोल बिश्नोई व विक्रम बराडचा समावेश आहे. तिहार जेलमध्ये रचलेला कट कॅनडामध्ये बसलेला गोल्डी ब्रांड व दुबईतील विक्रम बराडने प्रत्यक्षात उतरवला.
या कटात महत्त्वाची भूमिका अनमोल बिश्नोई व सचिन थापर याने बजावली. पंजाब पोलिसांनी चौकशीनंतर सांगितले की, मुसेवालाची रेकी करून गँगस्टर्स त्याच्याबाबतची संपूर्ण माहिती शार्प शूटर्सला देत होते. मुसेवालाची हत्या बुलेटप्रूफ वाहनातच करावी, असा लॉरेन्स टोळीचा आग्रह होता. त्याचमुळे हत्येसाठी रशियन शस्त्रे एएन ९४चा वापर करण्यात आला. यातून झाडलेली गोळी बुलेटप्रूफ काचही भेदू शकते. मुसेवालाचे बुलेटप्रूफ वाहन नेमके कशा प्रकारचे आहे, याची माहिती घेण्यासाठी गँगस्टर्स जालंधरला गेले होते. तेथे त्यांनी कंपनीच्या लोकांशी चर्चा केली होती.
सप्टेंबरमध्ये मागवणार होता बुलेटप्रूफ जॅकेट
मुसेवाला याला स्वत:च्या हत्येची शंका वाटत होती व त्यासाठीच तो अमेरिकेतून बुलेटप्रूफ जॅकेट मागवू इच्छित होता. त्यासाठी त्याने अमेरिकेतील आर्म्स डिलर विक्की मान सलौदी याच्याशी बातचीत केली होती. यानंतर मुसेवालाने लेव्हल थ्री हार्ड बुलेट जॅकेट मागविण्यास संमती दिली होती. हे जॅकेट एसएलआरमधून सोडलेली गोळीही रोखण्यास सक्षम आहे. अमेरिकेमधून सप्टेंबरमध्ये हे जॅकेट खरेदी केले जाणार होते. आपला एक मित्र हे जॅकेट घेण्यासाठी येईल, असे मुसेवालाने आर्म्स डिलरला सांगितले होते; परंतु तत्पूर्वीच मानसामध्ये २९ मे रोजी हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून मुसेवालाची हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. लाॅरेन्स बिश्नाेई हाच प्रमुख सुत्रधार असल्याचे मानले जात आहे.