मुशर्रफ मुळचे भारतीय त्यांना नागरिकत्व द्या, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 09:15 PM2019-12-19T21:15:16+5:302019-12-19T21:15:26+5:30
परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Next
नवी दिल्ली - देशद्रोहाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले परवेश मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व द्यावे अशी अजब मागणी भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केली आहे. परवेझ मुशर्रफ हे मुळचे दिल्लीतील आहेत. त्यामुळे त्यांना भारताने नागरिकत्व द्यावे, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे. दरम्यान, स्वामी यांच्या या मागणीमुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
We can give Musharraf fast track citizenship since he is from Daryaganj and suffering persecution. All self—acknowledged descendants of Hindus are qualified in a new CAA to come
— Subramanian Swamy (@Swamy39) December 19, 2019
सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून मोठा विवाद उत्पन्न झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी ट्विट करून परवेझ मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे.
2007 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्रपती असताना आणीबाणी लागू केली होती. यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे. परवेझ मुशर्रफ 1999 ते 2008 या काळात सत्तेत होते.
देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. परवेझ मुशर्रफ यांनी 2007 ला शंभरहून अधिक न्यायाधीशांना पदावरून हटवले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. याशिवाय, परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह अनेक खटले सुरू आहेत.