मुस्लीम बोर्डाचे प्रतिज्ञापत्र ही निव्वळ धूळफेक - रोहटगी
By admin | Published: May 24, 2017 02:34 AM2017-05-24T02:34:25+5:302017-05-24T02:34:25+5:30
‘ट्रिपल तलाक’च्या प्रश्नावर ‘आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने समाजासाठी आणि काझींसाठी तयार केलेली मार्गदर्शिका आणि त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘ट्रिपल तलाक’च्या प्रश्नावर ‘आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने समाजासाठी आणि काझींसाठी तयार केलेली मार्गदर्शिका आणि त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सादर केलेले प्रतिज्ञापत्र ही निव्वळ धुळफेक आणि समाजात थोडीफार वैधता मिळविण्यासाठी केलेली शेवटची धडपड आहे, अशी टीका अॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी मंगळवारी केली.
ही प्रथा अनिष्ट असल्याचे कबुल करूनही न्यायालयात त्याचे समर्थन करणाऱ्या बोर्डाला मुळात अशा प्रकारचे सल्ले जारी करण्याचा अधिकारच काय, असा प्रश्न उपस्थित करून रोहटगी म्हणाले की, सर्वांचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला गेल्यानंतर बोर्डाने असे करणे हा न्यायालयाचे लक्ष भलतीकडे वळविण्याचा प्रकार आहे. ही प्रथा चांगली नाही, असे वाटते तर बोर्डाने स्वत:हून ती रद्द करण्यास न्यायालयास सांगायला हवे होते, असेही त्यांनी नमूद केले.
रोहटगी असेही म्हणाले की, माझ्या मते बोर्डाचे ताजे प्रतिज्ञापत्र ही धूळफेक आहे. बोर्डाला स्वत:ला काही वैधता नाही. ते मुस्लीम समाजातील किती लोकांच्या वतीने हे म्हणणे मांडत आहेत, हेही कळायला मार्ग नाही. त्यांनी सांगितलेले लोकांनी ऐकावे, असा त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाही. बोर्डाने केलेल्या सल्लावजा सूचना किती काझींना समजतील, किती त्यांच्याशी राजी होतील व किती त्या प्रत्यक्षात पाळतील, हाही एक प्रश्नच आहे. पुढे ते म्हणाले, बोर्डाने सल्ला दिला म्हणून ‘निकाह’च्या वेळी किती काझी नवरदेवाला ‘ट्रिपल तलाक’ न देण्याबाबत सांगून तशी अट निकाहनाम्यात घालतील हेही स्पष्ट नाही.