मुस्लीम गुन्हेगारी प्रवृत्तीचे; हिंदूंनी त्यांना घरात घेऊ नये- बनवारीलाल सिंघल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:32 AM2018-04-11T04:32:24+5:302018-04-11T04:32:24+5:30
हिंदूंनी मुस्लिमांना घरात घेऊ नये असे वादग्रस्त उद्गार राजस्थानातल्या अलवार शहरातील भाजप आमदार बनवारीलाल सिंघल यांनी काढले आहेत.
अलवार : हिंदूंनी मुस्लिमांना घरात घेऊ नये असे वादग्रस्त उद्गार राजस्थानातल्या अलवार शहरातील भाजप आमदार बनवारीलाल सिंघल यांनी काढले आहेत. मुस्लिमांना मी घरात घेत नाही किंवा त्यांची मतेही मला नकोत, असेही सिंघल यांनी म्हटले आहे.
बनवारीलाल सिंघल हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. अलवार येथे रविवारी घेतलेल्या सभेत ते म्हणाले की, मुस्लिम भाजपला कधीही मतदान करीत नाहीत. मीही मतांसाठी त्यांचे लांगुलचालन करत नाही. मुस्लिम हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्या गैरकृत्यांवर पांघरुण घालावे या अपेक्षेनेच ते मला मतदान करणार. नेमके हेच मला नको आहे. याच कारणासाठी मी मुस्लिमांना कायम लांब ठेवतो.
विश्व हिंदू परिषद व रा. स्व. संघाशी निकटचा संबंध असलेले बनवारीलाल सिंघल यांनी सांगितले की, गोहत्या, लव्ह जिहाद, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे अशा अनेक गुन्ह्यांत मुस्लिमांचा सहभाग असतो. अलवार येथील लोकसभा मतदारसंघात जानेवारी महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आमदार सिंघल यांनी वादग्रस्त विधाने करण्याचे प्रमाण वाढले आहे.
>हिंदू मुली उच्च शिक्षण घेतल्या की सेक्युलर बनतात
राजस्थानमधील अलवार व भरतपूर जिल्ह्यातील मुस्लिमांना मेओ किंवा मेवाती मुस्लिम म्हणूनही ओळखले जाते. ते कधीही आपल्या पक्षाला मतदान करत नाही याचा बनवारीलाल सिंगल यांना राग आहे. लव्ह जिहाद घडविण्यासाठी
मेओ मुस्लिमांना भरपूर पैसा पुरविला जातो असा आरोपही त्यांनी केला आहे. मेओ मुस्लिम हिंदू महिलेशी लग्न करुन तिचे आयुष्य नरकासमान करतात. त्याउलट एखादी मुस्लिम महिला अल्पशिक्षित किंवा अशिक्षित असली तरी हिंदू युवकाशी अजिबात विवाह करत नाही. मुस्लिम युवकांच्या जाळ्यात अडकत असल्याबद्दल हिंदू युवतींना बनवारीलाल सिंघल यांनी दोष दिला आहे. ते पुढे म्हणाले की, बुद्धिमान व उच्च शिक्षित असलेल्या हिंदू तरुणी सेक्युलर बनतात व मेओ मुस्लिमांशी विवाहबद्ध होतात. मात्र विवाहानंतर मेओ मुस्लिम आपल्या हिंदू पत्नीपासून वेगळे होतात.