मुस्लिम मुलीने हिंदू मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका
By admin | Published: March 9, 2016 01:51 PM2016-03-09T13:51:19+5:302016-03-09T13:51:19+5:30
एकीकडे धर्मावरुन भांडणं सुरु असताना नाजीया या 15 वर्षीय मुस्लिम मुलीने आपल्या जीवाची पर्वा न करता या डिंपी या हिंदू मुलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
आग्रा, दि. ९ - एकीकडे धर्मावरुन भांडणं सुरु असताना नाजीया या 15 वर्षीय मुस्लिम मुलीने आपल्या जीवाची पर्वा न करता या डिंपी या हिंदू मुलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली आहे. नाजीयावर शहरभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
7 ऑगस्टला नाजीया आपल्या घरी जात असताना तिला कोणीतरी मुलगी रडत असल्याचा आवाज ऐकू आला. ती मुलगी मदतीची याचना करत होती. नाजीयाने पाहिलं तेव्हा दोन तरुण त्या मुलीला जबदरस्तीने खेचून बाईकवर बसवण्याचा प्रयत्न करत होते. नाजीयाने आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली आणि त्या मुलीला तरुणांच्या तावडीतून सोडवलं आणि तेथून पळ काढला.
नाजीयाला नंतर कळल की तिने ज्या मुलीची सुटका केली आहे ती डिंपी तिच्याच शाळेत खालच्या इयत्तेत शिकते. एकीकडे धर्मावरुन वातावरण चिघळलं असताना डिंपीचे पालक मात्र नाजियाला मुलीप्रमाणे वागवत आहेत.
'मला तेव्हा जे योग्य वाटलं ते मी केलं, तेव्हा 12.30 वाजले होते, मी डिंपीला रडताना पाहिलं. मी तिथे गेले आणि तिचा हात खेचून तिला वाचवलं' असं नाजियाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं आहे. आपल्या धाडसाचं वर्णन करताना नाजियाने तो 2 मिनिटांचा रस्सीखेच होता असं म्हणलं आहे. अपहरणकर्ते तिला बाईकवर खेचत होते तर मी मागे खेचत होती आणि शेवटी त्यांनी हात टेकले आणि पळ काढला असं नाजियाने सांगितलं आहे.