तलाकवर मुस्लिम लॉ बोर्ड प्रतिवादी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2016 05:29 PM2016-04-18T17:29:42+5:302016-04-18T17:29:42+5:30
मुस्लिम पुरुषांचा हक्क अबाधित राहावा आणि तलाक या प्रथेत कोणताही बदल होऊ नये, यासाठी मुस्लिम लॉ बोर्ड प्रयत्न करणार आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १८- सर्वोच्च न्यायालयानं शायरा बानो प्रकरणात तलाक असंवैधानिक असल्याची टिपण्णी केल्यानं मुस्लिम लॉ बोर्डानं प्रतिवादी होण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम पुरुषांचा हक्क अबाधित राहावा आणि तलाक या प्रथेत कोणताही बदल होऊ नये, यासाठी मुस्लिम लॉ बोर्ड प्रयत्न करणार आहे. तलाक हा घटनाबाह्य ठरवणा-या केलेल्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम लॉ बोर्डानं प्रतिवादी होणार आहे. यामुळे 1985च्या काळातलं शाहा बानो प्रकरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडच्या शायरा बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात तलाक हा घटनाबाह्य ठरवण्याची याचिका केली आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अधिकारांची पायमल्ली होत असल्याचं कारण देत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दखल घेऊन सुनावणीही केली होती. दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम लॉ बोर्डाला प्रतिवादी केलं आहे.
मुस्लिम कायद्यात केंद्र सरकार किंवा कोणत्याही अन्य सरकारचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही, शायरा बानो प्रकरणातही आम्ही हा आक्षेप नोंदवणार असल्याचं यावेळी मुस्लिम लॉ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितलं आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनीही मुस्लिम लॉ बोर्डाला पाठिंबा जाहीर केला आहे.