जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:37 AM2019-05-17T11:37:04+5:302019-05-17T11:38:49+5:30
जिल्ह्यात जातीय तणाव असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन
हैलाकांडी: जिल्ह्यात जातीय तणाव असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी घटना आसामच्या हैलाकांडीत घडली. हैलाकांडीत जातीय तणाव असल्यानं रविवारी संचारबंदी लागू होती. त्यामुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणतंही वाहन उपलब्ध नव्हतं. अशा परिस्थितीत शेजारी राहणारी मुस्लिम व्यक्ती त्या महिलेच्या मदतीला धावली. महिला वेळेवर रुग्णालयात पोहोचल्यानं तिची व्यवस्थित प्रसूती झाली. तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला.
रविवारी घडलेली ही घटना बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महिलेच्या घरी भेट दिल्यानं प्रकाश झोतात आली. जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यानं नंदिता यांना रुग्णालयात जाण्यासाठी वाहन मिळत नव्हतं. त्यांचे पती रुबन दास चिंतेत होते. राजयेशपूर गावात वास्तव्यास असणाऱ्या या दाम्पत्यांना अनेकांना मदतीसाठी फोन केले. पण संचारबंदी लागू असल्यानं कोणीही मदत करायाला पुढे आलं नाही. नंदिता यांच्या प्रसूतीकळा वाढत होत्या. त्यावेळी शेजारी राहणारा रुबन यांचा मित्र मकबूल हुसेन लस्कर मदतीला धावला. संचारबंदीचा पर्वा न करता मकबूलनं रुबन आणि नंदिता यांना स्वत:च्या रिक्षातून रुग्णालयात दाखल केलं.
रुबन माझा शेजारी आहे. त्याच्या पत्नीला वेदना सुरू होत्या. त्यामुळे मी संचारबंदी असतानाही रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असं मकबूल यांनी सांगितलं. आम्ही संध्याकाळी 5 वाजता निघालो. 20 मिनिटांत रुग्णालयात पोहोचलो. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत प्रसूती झाली, अशी माहिती त्यांनी दिली. वेळेवर मदतीला धावल्याबद्दल रुबन यांनी मकबूल यांचे आभार मानले. नंदिता आणि रुबन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. मकबूल यांनी केलेल्या मदतीचं रुग्णालयाच्या प्रशासनानंही कौतुक केलं. जिल्ह्यात जातीय तणाव असताना मकबूल यांनी केलेली मदत हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणारी असल्याचं एस. के. रॉय नागरी रुग्णालयाचे प्रशासक भास्कर दास यांनी म्हटलं.