हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी मुस्लिम व्यक्तीचा पुढाकार
By admin | Published: October 27, 2016 07:11 PM2016-10-27T19:11:36+5:302016-10-27T21:55:32+5:30
पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीनं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडवलं आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 27 - राजकारणासाठी एकीकडे धर्मांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचे प्रकार सुरू असतानाच पश्चिम बंगालमध्ये एका व्यक्तीनं हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर येथील रहिवासी असलेले यासिन पठाण यांनी अनेक वर्षांपूर्वीच्या 34 मंदिरांच्या संरक्षण आणि जीर्णोद्धारासाठी आंदोलन छेडलं आहे.
यासीन पठाण हे एका शाळेत शिपायाची नोकरी करत होते. या नोकरीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक मंदिरांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. त्यांनी मंदिरांच्या संरक्षण आणि जीर्णोद्धारासाठी आंदोलनही छेडलं आहे. अनेक वर्षांपासून ते कार्याशी जोडले गेले आहेत. जवळपास 34 मंदिरांची स्थिती सुधारण्यासह जीर्णोद्धारासाठी ते आंदोलन करत आहेत.
यासीन पठाण यांच्या मते पश्चिम बंगालमधल्या मिदनापूरमध्ये जवळपास 300 वर्षं जुनी अनेक मंदिरं आहेत. ज्या भागात हे मंदिर आहेत तेथे पूर्वी 80हून अधिक मंदिरं होती. मात्र त्यातील बरीचशी आता गायब झाली आहेत. सुरुवातीच्या काळात मुस्लिम असल्याकारणानं हिंदूंनी त्यांना विरोध केला होता. मात्र त्यांनी तरीही आजतागायत मंदिरांच्या बचावासाठी आंदोलन अविरत सुरू ठेवलं आहे. 1973पासून ते मंदिराच्या बचावासाठी कार्य करत आहेत. तर 1992मध्ये त्यांनी आर्कियोलॉजिकल समिती बनवली होती. यासीन पठाण यांना कबीर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.