जन्मदर घटूनही देशातील मुस्लिम टक्का वाढला!

By admin | Published: August 26, 2015 05:25 AM2015-08-26T05:25:01+5:302015-08-26T05:25:01+5:30

गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या

Muslim population of the country increased after birth of birth! | जन्मदर घटूनही देशातील मुस्लिम टक्का वाढला!

जन्मदर घटूनही देशातील मुस्लिम टक्का वाढला!

Next

नवी दिल्ली : गेली तीन दशके भारतात मुस्लिम लोकसंख्यावाढीचे प्रमाण इतर धर्मीयांच्या तुलनेने घटत असले, तरी एकूण लोकसंख्येमधील मुस्लिमांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत गेल्या १० वर्षांत अत्यल्प वाढले आहे. तसेच देशात जनगणना सुरू झाल्यापासून गेल्या ११० वर्षांत एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेले आहे.
सन २०११मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची जी धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर कार्यालयाने मंगळवारी जारी केली, त्यावरून हे चित्र समोर आले. ‘हम दो, उनके ग्यारह’ असे सांगत हिंदुत्ववादी संघटना देशातील मुस्लिमांची लोकसंख्या पद्धतशीरपणे वाढविण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा प्रचार करीत असल्या तरी वस्तुस्थितीतशी नाही, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जनगणना दर १० वर्षांनी केली जाते. आकडेवारीवरून असे दिसते की, सर्वच धर्मांच्या समाजांमध्ये लोकसंख्या वाढीचे दशवार्षिक प्रमाण घटत असले तरी हिंदुंच्या तुलनेत मुस्लिमांमधील ही घट अधिक वेगाने होत आहे. गेल्या तीन दशकांमध्येही अशीच स्थिती होती. तसेच मुस्लिमांमधील जननप्रमाणही हिंदूंच्या तुलनेत अधिक प्रमाणात कमी होत असल्याचे ही आकडेवारी सांगते.
असे असले तरी २००१ ते २०११ या दशकात इतर सर्व धर्मियांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण अत्यल्प घटले असले तरी फक्त मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण वाढले आहे.
जनगणनेच्या या ताज्या आकडेवारीनुसार,गणनेच्या १० वर्षांच्या काळात, हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्यांनी, शिखांचे ०.२ टक्क्यांनी व बौद्धांचे ०.१ टक्क्याने घटले आहे. याउलट मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.८ टक्क्याने वाढले आहे. ख्रिश्चन आणि जैन धर्मियांच्या या प्रमाणात फारसा फरक पडलेला नाही.
सन २०११मध्ये देशाची एकूण लोकसंख्या १२१.०९ कोटी होती. त्यात हिंदूचे प्रमाण ७९.८ टक्के होते. गेल्या १० वर्षांत हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ०.७ टक्क्याने कमी झाल्याने देशात हिंदूंची टक्केवारी प्रथमच ८० टक्क्यांच्या खाली गेली आहे.
याआधीही सरकार जनगणनेतील अशी धर्मनिहाय आकडेवारी जाहीर करीत असे. आता मात्र जनगणनेनंतर चार वर्षांनी व बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आकडेवारी जाहीर करण्याच्या मोदी सरकारच्या हेतूबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.
बिहारमध्ये एकूण २४३ पैकी किमान ५० मतदारसंघांत निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकेल एवढी मुस्लिम लोकसंख्या आहे. २००१ च्या जनगणनेतील आकडेवोरीवरून मुस्लिमांची लोकसंख्या तुलनेने अधिक दराने वाढत असल्याचे चित्र समोर आल्याने मोठा वाद झाला होता.
वस्तुत: तशी स्थिती नव्हती. कारण ज्या १९९१च्या जनगणनेशी तुलना केली गेली त्यावेळी फुटीरवादी कारवायांच्या अशांत वातावरणामुळे मुस्लिम बहुल जम्मू-काश्मीरमध्ये शिरगणती केली नव्हती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

लोकसंख्येचे धर्मनिहाय चित्र
धर्म प्रमाण (टक्के)
हिंदू ७९.८
मुस्लीम १४.२
ख्रिश्चन २.३
शीख १.७
बौद्ध ०.७
जैन ०.४
इतर ०.७
धर्म न सांगणारे ०.२

धर्मनिहाय लोकसंख्या वाढ
धर्म प्रमाण
हिंदू १६.८ टक्के
मुस्लिम २४.६ टक्के
ख्रिश्चन १५.५ टक्के
शिख ८.४ टक्के
बौद्ध ६.१ टक्के
जौन ५.४ टक्के
१७.७ टक्के
दशकातील एकूण वाढ

Web Title: Muslim population of the country increased after birth of birth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.