तेलंगणात मुस्लीम मते निर्णायक; टीआरएसला एमआयएमची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:27 AM2018-11-24T05:27:18+5:302018-11-24T05:27:48+5:30
तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे.
- धनाजी कांबळे
हैदराबाद : तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे. विशेषत: मुस्लीम समाजाची मते या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
तेलंगणात १२.७ टक्के मुस्लीम समाज आहे. सर्वच मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. मात्र, प्रामुख्याने अदिलाबाद, मेहबूबनगर, निजामाबाद, नालगोंडा, रंगारेड्डी, हैदराबाद, मेडक आणि करीमनगरमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य आहे. गेल्या, २०१४ च्या निवडणुकीत तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा होता. किंबहुना या मुद्यावर केसीआर यांनी निवडणुकीत विजयश्री मिळवली होती. मुस्लीम समाजानही केसीआर यांच्या टीआरएसलाच पाठिंबा दिला होता. विशेषत: उत्तर तेलंगणातील जनता केसीआर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती.
तज्ज्ञांच्या मते, लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या भीतीने केसीआर यांनी मुदतीआधीच विधानसभा बरखास्त केली. एकत्र निवडणुका झाल्यास राज्याच्या मुद्यांऐवजी राष्ट्रीय मुद्यांभोवतीच निवडणूक फिरेल, असे केसीआर यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी मुदतीआधीच विधानसभा बरखास्त केली. भाजपाच्या समर्थन किंवा विरोधाचा मुद्दाच फार चर्चेत राहील आणि विधानसभेत मुस्लीम मते कुठे जातील, याची खात्री नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचलले, असे के. नागेश्वर म्हणाले.
आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) २०१४ पासून काँग्रेससोबत नाही. आता एमआयएम व टीआरएस यांचे चांगले संबंध आहेत. एमआयएमचा हैदराबादमधील ७ मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. गेल्यावेळी एमआयएमने या मतदारसंघात वर्चस्व सिद्ध केले. या विभागात ४० टक्के मुस्लीम आहेत. त्यामुळे टीआरएस आणि एमआयएमच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा येथे होत आला आहे. काँग्रेसकडे वळणारी मते टीआरएसकडे वळविण्याचा एमआयएमचा प्रयत्न असेल, असेही के. नागेश्वर म्हणतात.
एमआयएमबरोबरच टीआरएस आणि भाजपची यांचीही मैत्री असल्याचे बोलले जाते. हे दोघे एकमेकांविरोधात भूमिका घेत आहेत. मात्र, मुस्लिमांची मते काँग्रेसला जाऊ नयेत, यासाठी असे दाखवले जात असल्याचे तज्ज्ञांना वाटते.
याच चपलांनी मला मारा
कोरुटला मतदारसंघात अकुला हनुमंत या अपक्ष उमेदवाराकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. प्रचारासाठी घराघरात जाऊ न तो आपले माहितीपत्रक मतदारांना देताना सोबत तो चपलांचा (स्लिपर्स) जोडही प्रत्येक घरात देत आहे. मी दिलेली आश्वासने पूर्ण नाही केली, तर तुम्ही याच चपलांनी मला बडवा, असे तो सांगत आहे.