मुस्लिम तरुणीचा ख्रिश्चन तरुणाशी विवाह, मस्जिद कमिटीच्या आदेशानंतर कुटुंबावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 12:41 PM2017-10-24T12:41:55+5:302017-10-24T15:37:28+5:30
आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुस्लिम तरुणीच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. केरळच्या मलाप्पुरम जिल्ह्यातील मस्जिद कमिटीने दुस-या धर्मातील तरुणाशी लग्न केल्याने हा निर्णय सुनावला
कोच्ची - आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुस्लिम तरुणीच्या कुटुंबीयांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. केरळच्या मलाप्पुरम जिल्ह्यातील मस्जिद कमिटीने दुस-या धर्मातील तरुणाशी लग्न केल्याने हा निर्णय सुनावला. 18 ऑक्टोबर रोजी मदारुल इस्लाम संघम महाल्लू कमिटीच्या सचिवाने एक नोटिफिकेशन जारी करत मस्जिदमध्ये येणा-या सर्वांना आवाहन केलं आहे की, कुन्नुम्मल युसूफ आणि कुटुंबियांसोबत सर्व संबंध तोडण्यात यावेत आणि त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात यावा. युसूफच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी परवानगी दिली असल्यानेच मस्जिद कमिटीने कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा आदेश सुनावला आहे. कुटुंबाने परवानगी दिल्यानंतरच युसूफ यांच्या मुलीने एका ख्रिश्चन तरुणाशी लग्नगाठ बांधली. युसूफ यांच्या मुलीने लग्न केल्यापासूनच त्यांच्या कुटुंबाचा बहिष्कार केला जात आहे.
A mosque committee in Kerala’s Malappuram called for boycott of a Muslim man & his family after he allowed his daughter to marry a Christian pic.twitter.com/QmVGJnAxl7
— ANI (@ANI) October 24, 2017
मल्याळी भाषेत असणा-या मस्जिद कमिटीच्या नोटिफिकेशनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'आम्ही निर्णय घेतला आहे की, कोणतीही व्यक्ती युसफू आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मस्जिदशी संबंधित किंवा इतर कोणत्याही कामाच्या निमित्ताने संबंध ठेवणार नाही'. युसूफ यांची मुलगी जसीलाने 20 ऑक्टोबर रोजी विशेष विवाह कायद्याअंतर्गत टिस्को टॉमी याच्याशी लग्न केलं. लग्नाच्या एक दिवसानंतर कुटुंबाने पेरिंथलमन्ना येथे थाटामाटात रिसेप्शन सोहळा आयोजित केला होता. अनेक लोक रिसेप्शनसाठी आले होते. या लग्नातील सर्वात खास गोष्ट होती ती म्हणजे, धार्मिक बंधनं तोडत एक नवं उदाहरण सर्वांसमोर ठेवण्यात आलं. हे लग्न ना मुस्लिम प्रथेप्रमाणे पार पडलं, ना ख्रिश्चन पद्धतीने.
जसीलाचे काका राशिद यांनी फेसबूकच्या माध्यमातून लग्नाची माहिती दिली. त्यांनी रिसेप्शनचे काही फोटोही शेअर केले होते. यानंतर हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून युझर्स मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. राशिद यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये जसीलाला कोणाशी लग्न करायचं हा निर्णय घेण्याचा पुर्ण हक्क असल्याचं लिहिलं आहे. जसीला आणि टिस्कोचं लग्न हा काही पहिला आंतरधर्मीय विवाह नाही. याआधीही असं झालं आहे.