"त्या" मुस्लीम महिलेने मुलाला दिलेलं नरेंद्र मोदी नाव बदललं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:00 PM2019-05-29T16:00:30+5:302019-05-29T16:19:25+5:30
मुलाचे नाव बदल्याची चर्चा असताना आता मुलाच्या जन्मदिवसावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची चर्चा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पहायला मिळत आहे. याचवेळी, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जन्मलेल्या एका बाळाचे नाव चक्क नरेंद्र मोदी ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र बाळाच्या आईने आपल्या मुलाचे नाव आता बदलले आहे. तर दुसरीकडे या मुलाच्या जन्मदिवसावरून सुद्धा आता वेगळाच दावा केला जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यामुळे देशात पुन्हा मोदी लाट असल्याची चर्चा आहे. मोदींच्या लोकप्रियता बघून प्रभावित झालेल्या उत्तरप्रदेशातील गोंडा येथील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र दामोदर दास मोदी असे ठेवले होतं. मात्र आता त्यामुलाचे नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे केले आहे. मुस्लीम समाज आणि शेजाऱ्यांच्या भितीमुळे तिने हे नाव बदल्याचे सांगण्यात येत आहे. बाळाची आई, मैनाज बेगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या नावाप्रमाणे बाळाचे नाव ठेवल्याने शेजारील लोकांनी तसेच समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
मुलाचे नाव बदल्याची चर्चा असताना आता मुलाच्या जन्मदिवसावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. या मुलाचा जन्म १२ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास झाला होता. मात्र महिलेने प्रसिद्धीझोतात येण्यासाठी मुलगा २३ मे रोजी जन्मल्याचं सांगितलं आणि त्यासाठी तिने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवलं, असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.