आयप्पा मंदिरात जाऊ पाहणाऱ्या मुस्लिम महिलेची अन्यत्र बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:03 AM2018-10-25T05:03:03+5:302018-10-25T05:03:16+5:30
शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणा-या महिला कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांची बीएसएनएलने कोचीमधील अन्य टेलिफोन एक्स्चेंजमध्ये बदली केली आहे.
तिरुअनंतपुरम : शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणा-या महिला कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांची बीएसएनएलने कोचीमधील अन्य टेलिफोन एक्स्चेंजमध्ये बदली केली आहे. ग्राहक संपर्क विभागातून त्यांना हलविण्यात आले असून, जिथे लोकांशी संबंध येणार नाही, अशा ठिकाणी त्यांची बदली केली आहे. रेहाना फातिमा यांची बीएसएनएल चौकशीही करीत आहे.
रेहाना फातिमा या केरळमध्ये महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने लढणाºया कार्यकर्त्या असून, त्या अनेक वर्षे बीएसएनएलमध्ये नोकरी करतात. आयप्पा मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यांत मंदिराची दारे प्रथमच उघडण्यात आली होती. त्यावेळी एका महिला पत्रकारासह रेहाना फातिमा यांनी मंदिरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघींना पोलिसांनी संरक्षणही दिले होते. मात्र, भाविकांच्या विरोधातमुळे दोघीही मधूनच परतल्या.
त्यानंतर मुस्लिमांच्या संघटनांनी रेहाना फातिमा यांच्याविरुद्ध जोरात आरडाओरड सुरू केली होती. मुस्लिम महिलेने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला होता. त्यानंतर तेथील मुस्लिम जमात परिषदेने रेहाना फातिमा यांना इस्लाममधून काढून टाकत असल्याची घोषणा केली.
पण हे प्रकरण येथे थांबले नाही. त्यांच्यावर इस्लाममधून काढण्याची कारवाई झाल्यावर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. या संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे सुरू केले. मंदिरात घुसू पाहणाºया या मुस्लिम महिलेवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. रेहाना फातिमा या मंदिरात जाण्याच्या प्रयत्नात असतानाही काही हिंदू मंडळींनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली होती. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल रेहाना फातिमा यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
>नोकरी सोडणार नाही
बीएसएनएलने केलेल्या बदलीनंतर आपण राजीनामा देणार नसल्याचे रेहाना फातिमा यांनी काही प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. त्या म्हणाल्या की, मला स्वत:लाही अन्यत्र बदली हवी होती. त्यामुळे नोकरी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.