मुस्लिम महिलांना गुलामासारखे वागवले जाते - साक्षी महाराज
By admin | Published: April 17, 2016 06:48 PM2016-04-17T18:48:32+5:302016-04-17T18:48:32+5:30
हिंदू धर्मामध्ये महिला ज्या प्रमाणे मंदिरात मुक्तपणे पूजा करतात त्याप्रमाणे मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये नमाजपठणाची परवानगी दिली पाहिजे असे साक्षी महाराज म्हणाले.
Next
ऑनलाइन लोकमत
उन्नाव, दि. १७ - उत्तरप्रदेशातील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकाद वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुस्लिम धर्मामध्ये महिलांना गुलामासारखी वागणूक दिली जाते असे त्यांनी म्हटले आहे. हिंदू धर्मामध्ये महिला ज्या प्रमाणे मंदिरात मुक्तपणे पूजा करतात त्याप्रमाणे मुस्लिम महिलांना मशिदीमध्ये नमाजपठणाची परवानगी दिली पाहिजे असे साक्षी महाराज म्हणाले.
उन्नावच्या गादन खेडा येथे आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली. भारत देश फतव्यांवर नाही तर, संविधानानुसार चालतो असे त्यांनी सांगितले. शिर्डीचे साईबाबा आणि शनी देवाची पूजा करु नका असे सांगणा-या शंकराचार्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली.
अशी विधाने करणारे स्वामी स्वरूपानंद सरस्वती शंकराचार्य बनण्यासाठी पात्र आहेत का ? असा सवाल साक्षी महाराजांनी विचारला. समाजामध्ये फूट पाडण्यासाठी ते अशी विधाने करत आहेत. या शंकराचार्यांना काँग्रेसने प्रेरणा दिली आहे. काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या नितीप्रमाणे ते राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला. महत्वाच्या धार्मिक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांना खुले आव्हान दिले आहे.