महिलांना गुलाम बनवून ठेवल्यानेच मुस्लिम मागे - कुलगुरु झमीर शाह
By admin | Published: October 5, 2015 12:23 PM2015-10-05T12:23:19+5:302015-10-05T12:26:49+5:30
महिलांना गुलाम बनवून ठेवल्यानेच मुसलमान विकासात पिछाडीवर गेले असे परखड मत अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्र कुलगुरु व निवृत्त लेफ्टनंट जनरल झमीर उद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १० - महिलांना गुलाम बनवून ठेवल्यानेच मुसलमान विकासात पिछाडीवर आहेत असे परखड मत अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्र कुलगुरु व निवृत्त लेफ्टनंट जनरल झमीर उद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे. तुम्ही तुमच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचा काहीच वापर करत नाही, मुस्लिम महिलांना घरात गुलाम म्हणून ठेवले जाते, त्यामुळे तुम्हीदेखील गुलाम बनला आहात असे खडे बोल त्यांनी सुनावले आहे.
रविवारी लखनौमधील एका कार्यक्रमात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्र कुलगुरु झमीर शाह यांनी त्यांची रोखठोक मतं मांडली. इराण व तुर्की वगळता सर्वच मुस्लिम देशांमध्ये महिलांना गुलाम बनवून ठेवले जाते. त्यामुळेच मुस्लिम हे पिछाडलेले आहेत असे शाह यांनी म्हटले आहे. मुस्लिमांच्या कामाच्या पद्धतीवरही त्यांनी चांगलीच टीका केली. मुसलमान हे वर्षातील ११ महिनेच काम करतात, रमझानच्या महिन्यात ते कामच करत नाही. तसेच साधारणतः आठवड्यातील अडीच दिवस ते काम करत नाही. शुक्रवारी ते नमाझच्या तयारीत असतात, त्यानंतर वीक एंड येतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तुम्ही शिक्षण सोडले, समाजातही अंतर्गत कलह आहे, धर्माच्या आधारे भेदभाव होत आहे आणि याचा फटका अलीगढ मुस्लिम विद्यापीठालाही बसतो असे त्यांनी नमूद केले.