मुस्लिम महिलांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं 'हराम', देवबंदचा अजब फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 07:08 PM2017-10-19T19:08:03+5:302017-10-19T19:08:18+5:30
जर तुम्ही मुस्लिम असाल आणि तुमच्या फेसबुक, ट्विटरसारख्या इतर सोशल साइट्सवरून फोटो अपलोड किंवा शेअर करत असाल तर तुमच्याविरोधात फतवा काढला जाऊ शकतो.
सहारनपूर- जर तुम्ही मुस्लिम असाल आणि तुमच्या फेसबुक, ट्विटरसारख्या इतर सोशल साइट्सवरून फोटो अपलोड किंवा शेअर करत असाल तर तुमच्याविरोधात फतवा काढला जाऊ शकतो. जगविख्यात इस्लामिक शिक्षण संस्था दारूम उलूम देवबंदनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं किंवा शेअर करण्याला हरामचा करार देत फतवा जारी केला आहे.
एका मुस्लिम व्यक्तीनं देवबंद संस्थेला फेसबुक व व्हॉट्सअॅपवर स्वतःच्या पत्नीचा फोटो अपलोड किंवा शेअर करण्यास इस्लामममध्ये मान्यता आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर निर्णय देताना देवबंदनं हा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिला व पुरुषांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या सदस्यांचे फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅप व अन्य सोशल साइट्सवर अपलोड करणं इस्लाममध्ये अन्यायकारक आहे, असं उत्तर देवबंद फतवा विभागानं जारी केलं आहे.
हा फतवा एका व्यक्तीसाठी जरी जारी करण्यात आला असला तरी जगभरातील मुस्लिमांसाठी हा लागू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. परंतु फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल साइट्सवर स्वतः किंवा पत्नी व अन्य महिलेचे फोटो अपलोड करणे तसेच शेअर करण्याला इस्लाममध्ये मान्यता नाही, असंही देवबंदनं स्पष्ट केलं आहे.