अटकसत्रांमुळेच मुस्लीम तरुण झाले कट्टर
By admin | Published: December 23, 2015 02:21 AM2015-12-23T02:21:38+5:302015-12-23T02:21:38+5:30
मुस्लिमांचा सामाजिक-आर्थिक बहिष्कार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम समाजाच्या युवकांना होणारी अटक हेच मुस्लिमांतील कट्टरता वाढण्याचे मुख्य कारण आहे.
नवी दिल्ली : मुस्लिमांचा सामाजिक-आर्थिक बहिष्कार आणि दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिम समाजाच्या युवकांना होणारी अटक हेच मुस्लिमांतील कट्टरता वाढण्याचे मुख्य कारण आहे. भूज येथे रविवारी झालेल्या पोलीस महासंचालकांच्या संमेलनात हा सूर व्यक्त झाला. कट्टरता हा सादरीकरण आणि चर्चेचा मुख्य विषय होता.
इंटेलिजन्स ब्युरोने आयोजित केलेल्या या वार्षिक संमेलनात अंतर्गत सुरक्षेच्या विविध पैलूंवर दहा पेपर सादर करण्यात आले. तेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांनी सादर केलेला विषय इस्लामिक स्टेटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक विवेचनात्मक ठरला. अपेक्षित सामाजिक आणि आर्थिक लाभ मुस्लिमांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्यात उपेक्षा बळावली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये मूलभूत नागरी सोयी आणि आर्थिक संधी कशा नाकारण्यात येतात यावर शर्मा यांनी प्रकाश टाकला. या कारणांमुळेच मुस्लिम समाज कट्टरतेकडे वळत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी हैदराबादेतील मक्का मशीद बॉम्बस्फोटाचे उदाहरण दिले. या स्फोटानंतर अनेक मुस्लिम युवकांना मोठ्या प्रमाणात अटक केली होती आणि नंतर ते सर्वच निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.