हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 08:49 AM2019-05-17T08:49:47+5:302019-05-17T08:50:40+5:30

नात्यांना जोडण्यासाठी धर्म आणि रक्ताची गरज असलीच पाहिजे असं नाही हे सिद्ध केल्याचं सांगितलं.

Muslim youth breaks ramzan fast to donate blood Hindu woman | हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा 

हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा 

googlenewsNext

सोनितपूर - एकीकडे देशात हिंदू आणि मुस्लिम यामध्ये वाद निर्माण करुन धर्माच्या नावावरुन ध्रुवीकरण केले जाते. तर दुसरीकडे आसाममधील एक घटना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं मोठं उदाहरण म्हणून समोर आलं आहे. रमजानचा महिना असताना रोजा तोडून एका मुस्लिम युवकाने 85 वर्षीय हिंदू महिलेला रक्तदान करुन तिचे प्राण वाचवले आहेत. या युवकाने केलेल्या कामाचं सोशल मिडीयात त्याच्यावर कौतुक होत आहे. 

माणुसकीला कोणताही धर्म नसतो हे आसाममधील या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आसाममधील सोनितपूर येथील रहिवाशी मुन्ना अन्सारी हे रमजाननिमित्त सूर्योदय ते सूर्यास्त रोजा ठेवतात. इस्लाम धर्मानुसार रोजा पाळण्याचे कडक नियम आहेत. मात्र रोजादरम्यान मुन्ना अन्सारी यांना विश्वनाथ सामान्य रुग्णालयातून आलेल्या एका कॉलमुळे त्यांनी रोजा तोडण्याचा निर्णय घेतला. 
विश्वनाथ जिल्ह्यातील ईटाखोला येथील रहिवाशी रेवती बोरा यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. एक आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेला बी निगेटिव्ह या रक्ताची गरज लागली. रक्तपेढीपासून नातेवाईकांपर्यंत सगळीकडे बी निगेटिव्ह हे रक्त शोधण्यासाठी धावपळ झाली मात्र कुठेही यश आलं नाही. त्यामुळे रुग्णालयाकडून मुन्ना अन्सारी यांना फोन करुन एका महिलेला बी निगेटिव्ह रक्ताची प्रचंड गरज असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मुन्ना अन्सारी यांनी वेळ न घालवता रुग्णालयातून पोहचून त्या महिलेसाठी रक्तदान केलं. 

मागील 3 दिवसांपासून रेवती बोरा यांच्यासाठी रक्त शोधण्याचं काम त्यांचे कुटुंबीय करत होते. मात्र ऐनवेळी मुन्ना अन्सारी यांनी पुढाकार घेत केलेल्या रक्तदानामुळे बोरा कुटुंबीय भावनिक झाले. रेवती बोरा यांचा मुलगा अनिल बोरा यांच्या डोळ्यात अश्रू येत अन्सारी यांचे आभार मानले तसेच मुन्ना अन्सारी यांनी त्यांचे आईचे प्राण वाचवून नात्यांना जोडण्यासाठी धर्म आणि रक्ताची गरज असलीच पाहिजे असं नाही हे सिद्ध केल्याचं सांगितलं.  बी निगेटिव्ह हा रक्तगट खूप कमी लोकांचा असतो. त्यामुळे रेवती बोरा यांना रक्त देण्यासाठी आलेला मुन्ना अन्सारी हा बोरा कुटुंबीयांसाठी देवदूत म्हणून आल्याचं सांगितलं जातंय. 
 

Web Title: Muslim youth breaks ramzan fast to donate blood Hindu woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.