'जय श्रीराम' म्हणत भाजपाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:27 AM2022-03-28T09:27:22+5:302022-03-28T09:29:02+5:30
भाजपच्या विजयानंतर मिठाई वाटणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अर्धमेल्या अवस्थेत छतावरून फेकलं
कुशीनगर: उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रामकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कठघरही गावात एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करत असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाला त्याच्याच समाजातील लोकांनी बेदम मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाला. त्याला आधी जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर लखनऊमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१० मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपनं दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली. याच विजयाचा आनंद साजरा करत बाबर नावाचा तरुण मिठाई वाटत होता. त्यावरून मुस्लिम समाजातील काही जण नाराज झाले. भाजपचा प्रचार का करतोस अशी विचारणा त्यांनी केली. भाजपचा प्रचार करू नकोस असं त्यांनी बाबरला बजावलं. त्यानंतर बाबरनं नेरामकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सुरक्षेची मागणी केली. मात्र पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.
पोलिसांनी सुरक्षा न दिल्यानं बाबरला धमकावणाऱ्या तरुणांची हिंमत वाढली. त्यांनी बाबरला मारहाण केली. बेदम मारहाण केल्यानंतर त्यांनी बाबरला छतावरून फेकलं. २० मार्चला ही घटना घडली. यानंतर बाबरवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. बाबरच्या पत्नीनं रामकोला पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असं एसडीएम वरुण पांडे यांनी सांगितलं. बाबरचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयार नव्हते. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. मात्र स्थानिक आमदार पी. एन. पाठक यांनी त्यांची समजूत काढली. पाठक यांनी बाबरच्या पार्थिवाला खांदा दिला. आरोपींना कठोर शिक्षा होईल असं वचन पाठक यांनी बाबरच्या कुटुंबीयांना दिलं.