मुस्लीम तरुणांत ‘रमजान अॅप्स’ची चलती
By admin | Published: June 22, 2016 02:44 AM2016-06-22T02:44:06+5:302016-06-22T02:44:06+5:30
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात हायटेक युवा पिढीसाठी नवे अॅप्स वरदान ठरत आहेत. गुगल प्लेवर अक्षरश: याबाबत माहितीचा खजिनाच खुला झाला आहे.
लखनौ : मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात हायटेक युवा पिढीसाठी नवे अॅप्स वरदान ठरत आहेत. गुगल प्लेवर अक्षरश: याबाबत माहितीचा खजिनाच खुला झाला आहे.
धर्मगुरू आणि मुस्लीम विद्वानांचे असे मत आहे की, रमजानच्या माहितीसाठी हे चांगले माध्यम आहे. अर्थात, यातील माहिती ही इस्लामच्या नियमानुसारच असावी. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून रोजे ठेवण्याचे महत्त्व, नमाजाबाबत माहिती, अतिशय सुंदर लिपीतील कुराण शरीफ आणि त्याचा अनुवाद, नमाजचे रिमाइंडर, विविध परिस्थितीत केल्या जाणाऱ्या दुआ यासह इस्लाममधील महत्त्वाची माहिती यात आहे. तरुण पिढीत याची सध्या मोठी क्रेझ असल्याचे दिसून येत आहे.
प्रमुख इस्लामी शोध संस्था दारुल मुसन्निफीन शिबली अॅकॅडमीचे संचालक प्रोफेसर इश्तियाक अहमद जिल्ली म्हणाले की, जर महत्त्वाची माहिती यातून मिळत असेल, तर चांगली बाब आहे. अर्थात, ते असेही म्हणाले की, इंटरनेटवरच्या हायवेवर एवढी गर्दी आहे की, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याची माहिती घेणे अवघड काम आहे. अशा वेळी याचा उपयोग करणाऱ्यांनी अतिशय सावध राहण्याची आवश्यकता आहे. धार्मिक अप्लिकेशनच्या प्रामाणिकपणाच्या तपासासाठी एक स्वतंत्र यंत्रणा हवी. (वृत्तसंस्था)