"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:28 AM2024-09-17T00:28:18+5:302024-09-17T00:30:18+5:30
"अल्पसंख्यांकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी इतरांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यापूर्वी स्वतःचे रेकॉर्ड बघावे."
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोमवारी (16 सप्टेंबर) भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याच आरोप केला. त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील मुस्लिमांना संघटित होण्याचे आवाहन करत, एका संदेशात भारत, गाझा आणि म्यानमारमधील मुस्लिमांसंदर्भात भाष्य केले.
खामेनेई यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये 'इस्लामचे शत्रू' अशा शब्दाचाही वापर केला आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये अयातुल्ला अली खामेनेई म्हणाले, "इस्लामच्या शत्रूंनी आपल्याला नेहमीच 'इस्लामी उम्माह'च्या आपल्या समान ओळखीबद्दल उदासीन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला म्यानमार, गाजा, भारत अथवा इतर कुठल्याही ठिकाणी एका मुस्लिमाला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती नसेल, तर आपण स्वतःला मुसलमान मानू शकत नाही.''
इराणने स्वतःकडे बघावे -
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या या कथित आरोपावर आता भारताचीही प्रतिक्रिया आली आहे. खमेनी यांच्या वक्तव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आरोपांला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे आणि खामेनेई यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, "इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्यांकांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हे चुकीच्या माहितीवर आधारित असून अस्वीकार्य आहे. अल्पसंख्यांकांवर टिप्पणी करणाऱ्या देशांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी इतरांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यापूर्वी स्वतःचे रेकॉर्ड बघावे."