पाकिस्तानपेक्षा भारतातील मुस्लिमांची स्थिती चांगली; निर्मला सीतारामन यांनी दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:17 PM2023-04-12T12:17:34+5:302023-04-12T12:17:56+5:30
सीतारामन म्हणाल्या की, अल्पसंख्याकांच्या संख्येत घट झाली असेल तर ती पाकिस्तानात.
वॉशिंग्टन :
भारतातील मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानात राहणाऱ्या मुस्लिमांपेक्षा खूपच चांगली आहे, असे सांगत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताबद्दलच्या नकारात्मक पाश्चात्य दृष्टिकोनाला चोख प्रत्युत्तर दिले. त्या अमेरिकेतील पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
सीतारामन म्हणाल्या की, अल्पसंख्याकांच्या संख्येत घट झाली असेल तर ती पाकिस्तानात. भारतात तुम्हाला दिसेल की प्रत्येक वर्गातील मुस्लीम आपापले व्यवसाय करत आहेत, त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. काही समाजातील मुलांना सरकारकडून फेलोशिप दिली जात असल्याची माहिती सीतारामन
यांनी दिली.
तर मुस्लिमांची संख्या वाढली असती का?
पीआयआयईचे अध्यक्ष ॲडम एस. पोसेन यांनी सीतारामन यांना पाश्चात्य मीडियात विरोधी खासदारांनी त्यांची पदे गमावणे
व भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांविरुद्धच्या हिंसाचाराबद्दल होत असलेल्या वार्तांकनाबद्दल छेडले असता अर्थमंत्री म्हणाल्या, ‘भारत हा जगातील असा देश आहे जिथे मुस्लिमांची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे व ती वाढतच आहे. जर भारतातील मुस्लिमांचे जगणे कठीण झाले आहे असे वाटत असेल तर १९४७ च्या तुलनेत मुस्लीम लोकसंख्या वाढली असती का?’ असा सवाल त्यांनी केला.