'भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?' ओवेसींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 09:45 AM2022-05-24T09:45:21+5:302022-05-24T09:46:20+5:30
ओवेसी यांनी यापूर्वी, पुष्यमित्राने तोडलेल्या बौद्ध मंदिरांसंदर्भात भाजप का भाष्य करत नाही, असा सवालही उपस्थित केला होता.
सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. यासंदर्भात, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापीचा संबंध औरंगजेबाशी जोडण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही, तर 'बात निकली है तो दूर तक जाएगी,' असे वक्तव्यही त्यांनी केले होते. आता ओवेसी यांना कोट करत AIMIM ने इतिहास आणि मुघल काळासंदर्भात ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले, भारतातील मुसलमानांचा मुघलांशी कसलाही संबंध नाही. पण हे सांगा, की मुघल बादशहांच्या बायका कोण होत्या? ओवेसी यांनी यापूर्वी, पुष्यमित्राने तोडलेल्या बौद्ध मंदिरांसंदर्भात भाजप का भाष्य करत नाही, असा सवालही उपस्थित केला होता.
मुग़लों से भारत के मुसलमानों का कोई रिश्ता नहीं है। लेकिन ये बताओ कि मुग़ल बादशाहों की बीवियां कौन थी? pic.twitter.com/oMH6xev014
— AIMIM (@aimim_national) May 23, 2022
'दुसरी मशीद कदापी गमावणार नाही' -
तत्पूर्वी, ज्ञानवापी वादावर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते, की मी सरकारला सांगू इच्छितो, की आम्ही एक बाबरी मशीद गमावली आहे. आता दुसरी मशीद कदापी गमावणार नाही. तुम्ही न्यायाची हत्या करून आमची मशीद हिसकावली आहे. दुसरी मशीद हिसकावू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.
"असदुद्दीन ओवेसी जनतेची दिशाभूल करतायत" -
ओवेसी यांनी कायद्याची पदवी घेतली असून, त्याचे ज्ञानही त्यांना आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करणे हे प्रार्थनास्थळ कायद्याचे उल्लंघन आहे, असे सांगून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. कायद्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मशीद किंवा मंदिर पाडायचे असेल तेव्हाच या कायद्याचा उल्लेख करता येईल. ते बेकायदेशीर नाही. याप्रकरणी न्यायालयाने निर्देश दिले आहेत, असे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.